मुंबई – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना पक्षात थोपवून धरण्याचे जोरदार प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून केले जात असून यासाठी त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याची तयारीही दाखवली गेल्याचे कळते.
श्रेष्ठींचा हा इरादा राणे यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी मंगळवारी माजी खासदार मिलिंद देवरा तसेच माजी मंत्री नसीम खान यांनी त्यांची नरीमन पॉईंट येथील कार्यालयात भेट घेतली. जवळजवळ अर्धा ते पाऊण तास या नेत्यांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी थोडी कळ सोसण्याचा दिलेला सल्ला राणे यांच्याकडे वैयक्तिकरित्या पोहोचविण्यासाठी हे दोन्ही नेते त्यांना भेटले.
गेल्या काही महिन्यांपासून राणे पक्षश्रेष्ठींवर कमालीचे नाराज आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला आलेल्या अपयशाचे खापर त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर फोडले आहे. आपल्या तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी त्यांनी राहुल गांधी यांची भेटही घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेससह इतर विरोधी पक्षांतर्फे संघर्षयात्रा काढली जात आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा मंगळवारी संपला. पण, या दोन्ही टप्प्यांमध्ये राणे सहभागी झाले नाहीत. याच काळात राणे यांनी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये जाऊन चर्चा केली. त्यामुळे आता राणे यांना पक्षात थोपवून धरण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजते.