नालेसफाईकडे लक्ष देण्याची गरज

0

भुसावळ । गेल्या वर्षी उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाईची झळ जाणवली होती. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते. पालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, टंचाईवर मात करता यावी, यासाठी दुरदृष्टी ठेवून फेब्रुवारीतच बंधार्‍याची उंची वाढवली. याच धर्तीवर आता आगामी पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन डोळ्यासमोर ठेवून शहरातील बलबलकाशीसह अन्य आठ नाल्यांच्या स्वच्छते प्रश्नी नियोजन करणे आवश्यक आहे.

उशिरा होणार्‍या नियोजनामुळे अडचणी
शहरातील नालेसफाईचा प्रश्न अंत्यत जटील आहे. पालिकेकडून नालेसफाईचे नियोजन दरवर्षी उशिरा केले जाते. यानंतर वेळेत नालेसफाई होत नाही. निविदेला मंजुरी मिळणे आदी कारणांमुळे पावसाळा सुरु झाल्यानंतर नालेसफाई केली जाते. सध्या सत्तेत असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या काळात याबाबतचे मुद्दे उपस्थित केले होते. यामुळे आता किमान सत्ताधार्‍यांनी वेळेपूर्वीच नालेसफाईचे उन्हाळ्या नियोजन केल्यास आगामी काळात आपत्ती व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार नाही.

पाण्याचा प्रवाह अधिक
शहरात बलबलकाशी नाल्यासह आठ प्रमुख नाले वाहतात. त्यांचे पाणलोटक्षेत्र थेट खडका, किन्ही, शिवपूर कन्हाळे आदी गावांपासून असल्याने पाण्याचा प्रवाह अधिक असतो. यामुळे खडका रोडवरील नाल्यांच्या शेजारील वस्त्या, पंचशीलनगरातील काही भागांमध्ये घरात पाणी शिरून आर्थिक नुकसान होते.