माजी उपसभापती प्रदिप थत्ते यांची मागणी
लोणावळा : लोणावळा नगरपरिषदेच्यावतीने येथील नांगरगाव भागामध्ये पाणी तुंबत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यापुर्वी कराव्या लागणार्या कामांमध्ये शहरातील नालेसफाई न केल्याने यंदा पहिल्याच पावसात नांगरगावात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती प्रदिप थत्ते यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रार केली आहे. पावसाळा अजुन सुरू व्हायचा आहे. ही सुरवात आहे, तरीही शहरात ही परिस्थिती दिसून येत आहे. पुढील महिन्यापासून मोठा पाऊस सुरू होत असतो, तेव्हा या यंत्रणेचे बारा वाजलेले लक्षात येतील. तरी ही कामे त्वरीत पुर्ण करावीत, अशी मागणीही प्रदीप थत्ते यांनी केली आहे.
लोणावळा शहरात मावळातील सर्वांधिक पाऊस पडतो. असे असताना देखिल शहरातील नदी व नाले सफाईची कामे योग्य प्रकारे करण्यात आलेली नाहीत. नांगरगाव व इतर काही भागात नालेसफाई न झाल्याने त्यामध्ये मोठमोठी झुडपे उगवली आहेत, एक ठिकाणी भिंत देखिल नाल्यात पडली आहे. इंद्रायणी नदीची देखिल शहरातील काही भागात सफाई करण्यात आली असली तरी बहुतांश भाग हा सफाईचा शिल्लक असल्याने मान्सुनच्या पहिल्याच टप्प्यात जोरदार पाऊस झाल्यास शहरात अनेक ठिकाणी पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. शहरातील मावळा पुतळा चौक व ट्रायोज मॉल समोर गटारे गायब झाल्याने त्याठिकाणी थोडा पाऊस झाला तरी पाण्याची तळी साचत आहे.
असाच प्रकार गवळीवाड्यातील बस स्थानका समोर आहे मागील सात ते आठ वर्षापासून येथिल गटारीचा प्रश्न रखडलेला असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. या पाण्यात व्हिपीएस शाळेत जाणार्या मुलांना जावे लागत असताना देखिल प्रशासन कारवाई करत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.