नाल्यांमधील कचर्‍यामुळे सांंडपाणी रस्त्यावर

0

भुसावळ। शहरातील जामनेर रस्त्यालगत असलेल्या नाल्यांची नियमितपणे साफसफाई होत नसल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणावर कचरा अडकून पडला आहे. यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळे निर्माण होत असून नाल्यामधील सांडपाणी रस्त्यावर साचले असल्यामुळे पालिकेस यासंदर्भात सुचना केली असता कर्मचारी नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी स्वखर्चातून मजुर लावून या नाल्यांची साफसफाई केली.

शहरात कर वसुलीची मोहिम राबविण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी वसुलीच्या कामासाठी लावण्यात आले आहेत. परिणामी शहरात नियमितपणे साफसफाईचे काम रखडले असून नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा अडकून पडला आहे. जामनेर रस्त्यालगत असलेल्या नाली चोकअप होऊन सांडपाणी रस्त्यावर साचले होते. यावेळी नगरसेवक कोठारी यांनी मुख्याधिकारी बाविस्कर यांना सांगून सफाईची मागणी केली मात्र कर्मचारी नसल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले असता कोठारी यांनी पदरमोड करुन सफाई केली त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला. यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.