पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परीषदेत सांगितले अनुभव ; डीपीआरप्रमाणे काम 20 वर्षात झालेच नाही ; पूर्वीच्या चुका दुरुस्त करणार -आमदारांसह नगराध्यक्षांची ग्वाही
भुसावळ- रहिवासी जागेवर शेती तर उद्यानांच्या जागांवर घरे बांधण्यात आली असून प्रत्यक्षात नाल्यांचे रूपांतर गटारीत झाले असून ओपन स्पेसवर अतिक्रमण झाल्याचे कडू-गोड अनुभव पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी पत्रकार परीषदेत सांगितले या शिवाय नागरीकांनी अशुद्ध होणारा पाणीपुरवठा, घंटागाड्या येत नसल्याची अडचण सांगून सर्वाधिक समस्या सांडपाण्याच्या निचर्याची असल्याचेही विद्यार्थी म्हणाले. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने पुणे अभियांत्रिकीचे 31 विद्यार्थी महाविद्यालयाचे एचओडी प्रताप रावळ यांच्या नेतृत्वात शहराच्या डीपीआर सर्वेसाठी सहा दिवसांपासून आले होते. मंगळवारी सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी एका हॉटेलात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधून अनुभव कथन केले. 20 वर्षापासून शहराचा डीपीआर प्लॉन असलातरी प्रत्यक्षात त्याप्रमाणे काम न झाल्याची खंत प्रताप रावळ यांनी व्यक्त करीत आगामी काळाततरी त्यात सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
ओपन स्पेसला अतिक्रमणाचा विळखा
दगडी पुल भागात जुन्या डीपी प्लॅननुसार रस्ते झाले नसल्याचे व त्यांची रूंदी कमी असल्याचे विद्यार्थी आकाश आटाळे म्हणाला तर स्नेहल पतंगे या विद्यार्थिनीने पाण्याबाबत नागरीक त्रस्त असल्याचे सांगितले. हंबर्डीकर चौकात अत्यंत वाहतूक कोंडीची समस्या असून शहरातील पाच पैकी तीन ओपन स्पेसवर अतिक्रमण झाल्याचे व शिवाजी नगरातील परीस्थिती कधीही सुधारणार नाही, अशी खंत या भागातील नागरीकांनी बोलून दाखवल्याचे केदार पाटील म्हणाला.
सांडपाण्याच्या निचर्याची व्यवस्थाच नाही
गडकरी नगरासह वरणगाव रोड भागातील रस्त्यांची दुरवस्था तसेच रींग रोडची रूंदीही अत्यंत कमी असून सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्थाच नसल्याचे साक्षी ढाके म्हणाली तसेच रहिवासी जागेवर शेती केली जात असून घंटागाडी येत नसल्याने उघड्यावर नागरीक कचरा टाकतात तसेच मुलांना खेळण्यासाठी या भागात जागा नाही, जनतेसाठी जागांचा विकास करण्याची या भागात गरज असल्याचे ती म्हणाली.
नाल्याऐवजी वाहताय गटारी
प्रज्ञा पाटील म्हणाली की, बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ सर्वाधिक पडक्या ईमारती आहेत शिवाय डीपीवर प्रत्यक्षात नाला असलातरी तेथे मात्र गटारी वाहत असून त्यावर ईमारती उभ्या असून 20 दिवसांपर्यंत पाणी येत नसल्याची नागरीकांनी खंत व्यक्त करीत नंदनवन कॉलनीत उद्यानाच्या जागेवर आता घरे उभारली गेल्याचे ती म्हणाले. नाहाटा महाविद्यालयाजवळ अपघाताचे प्रमाण पाहता तेथे फुटपाथ उभारण्याची गरज असल्याचेही तिने सांगितले. शुभम कुर्ले व निखील बद्रीकेसह अनेकांनी आपापले अनुभव कथन केले.
डीपीआरप्रमाणे कामच नाही
एचओडी प्रताप रावळ म्हणाले की, डीपीआरप्रमाणे प्रत्यक्षात काम झालेले नाही त्यामुळे आता सुधारणा आवश्यक आहे. एका प्लॉटचे तीन प्लॉट करण्यात आले असून सांडपाण्याचा निचरा करण्याची कुठेही व्यवस्था नसल्याने भविष्यात ही समस्या सोडवणे गरजेचे आहे. वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावीत आराखडा तयार करण्यात येणार असून पोलिस उपअधीक्षकांशीदेखील त्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरासाठी टोटल सेशन सर्वे गरजेचा असून गुगल तसेच सॅटॅलाईटची त्यासाठी मदत घेता येवू शकते तसेच जो प्लॅन आहे तो प्रत्यक्षात 20 वर्षात झाला नसलातरी आता डीपीआरप्रमाणे काम करणे गरजेचे असून महामार्ग व जंक्शनमुळे हे शहर महत्वाचे असल्याचेही रावळ यांनी सांगत यापूर्वी केरळसह कोल्हापूर, धुळे येथे डीपीआर बनवण्यात महाविद्यालयाची प्रमुख भूमिका राहिली असून महाराष्ट्रातील भुसावळचा पहिला डीपीआर सविस्तर राहणार असल्याचे ते म्हणाले.
सुविधांसाठी डीपीआर -आमदार
यापूर्वी सुविधा मिळालेल्या नसल्यानेच शहराचा डीपीआर तयार करण्यात येत असून या माध्यमातून वस्तुस्थिती समोर आली आहे. पूर्वी ज्या चुका घडल्या त्या दुरुस्त करण्यासाठी शहरवासीयांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले.
शहर विकासाचे व्हिजन -नगराध्यक्ष
नगराध्यक्ष व आमदार दोन्हीदेखील अभियंते असल्याने शहर विकासाचा योग जुळून आला असून शास्त्रशुद्ध पद्धत्तीने आता खर्या शहराचा विकास केला जाणार असल्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांनी सांगितले तर मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर म्हणाले की, चुकीच्या कामांची माहिती कळाल्यानंतर निश्चितच पालिका कारवाई करेल. 2021 मध्ये डीपीआर तयार होईल, असेही त्यांनी सांगितले.