दीड तोळे सोन्याची पोत, रोख 7 हजार असा एैवज लांबविला ; जिल्हापेठ पोलिसात तक्रार
जळगाव : महिलेची प्रसूती झाल्याने नाळखंडणी करण्यासाठी चला, असा बहाणा बनवत रस्त्याने जात असलेल्या गुलशन बी शेख युसूफ उर्फ गुलीखाला (वय 75) रा. पिंप्राळा न्यू ख्वॉजानगर हुडको या वृध्द महिलेस दुचाकीवर बसवून सावखेडा शेतशिवारातील शेतात नेले. त्यानंतर मारहाण करून महिलेच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची पोत तसेच लहान पिशवीतील सात हजार रूपये हिसकावून घेतल्याची घटना शनिवारी दुपारी पिंप्राळा सावखेडा रस्त्यालगत घडली.
गुलशन बी शेख युसूफ उर्फ गुलीखाला ह्या त्यांची मुले शेख सुपडू शेख युसूफ, रहीम शेख युसूफ तसेच शेख करीम शेख युसूफ नातवंडे, सुना यांच्यासह न्यू ख्वॉजानगर हुडको येथे कुटुबांसह वास्तव्यास आहेत 12 रोजी प्रकृती बिघडल्याने त्या दुपारी हुडकोतील मनपाच्या रूग्णालयात गेल्या. औषधोपचार केल्यानंतर त्यांच्याजवळील लहान पिशवीतून त्यांनी पैसे देऊन त्या रूग्णालयातून घराकडे पायी चालत जात होत्या.
दुचाकीवर बसवून शेतात नेवून केली मारहाण
दुचाकीवरून चेहरा झाकून आलेले दोन तरूण त्यांच्याजवळ थांबले. महिलेची प्रसूती झाली, नाळ खंडणीसाठी सोबत चला, असा बहाणा करून त्यांनी महिलेस दुचाकीवर बसवून सावखेडा रस्त्याकडे एका शेतात नेले. येथे दोन जण चेहरा झाकलेले थांबलेले होते. त्यातील एकाने महिलेच्या चेहर्यावर रूमाल धरला. त्यानंतर महिलेस मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली. तसेच महिलेजवळ असलेली लहान पिशवी हिसकावून घेतली. या पिशवीत मुलगा करीम शेख याच्या सेंट्रींग कामाच्या मजुरीचे सात हजार रूपये होते तेही घेवून भामटे घेऊन पसार गेले.
जखमी महिला जिल्हा रुग्णालयात दाखल
वृध्द महिलेले आरडाओरड केल्याने येथून दुचाकीवरुन जात असलेले दोघे थांबले. दुचाकी थांबताच संशयित पोत व रोकड घेऊन पसार झाले. यानंतर याच दुचाकीवरील दोघांनी महिलेस विचारपूस करुन हुडकोजवळ सोडले. घरी गेल्यावर महिलेने कुटुंबियांना हकीकत सांगीतली. कुटुंबियांनी जखमी गुलशन बी यांना उपचारासाठी जिल्हा रुगणालयात दाखल केले. रहीम शेख युसूफ यांनी हुडकोतील शाळेजवळ बसणार्या टवाळखोर तरुणांनी वृध्द आईला लुटल्याचा संशय व्यक्त केला असून याप्रकरणी त्यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली आहे. गुलशन बी शेख या महिला निदानासाठी माहितगार आहेत. ते ओळखून संशयितांनी संधी हेरली असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.