पिंपरी चिंचवड : सध्या आपण सर्वजण जागतिक स्पर्धेला तोंड देत आहोत, या जीवघेण्या स्पर्धेत आपणास टीकावयाचे असेल तर आपल्याला विद्यार्थी अवस्थेपासूनच कामामध्ये सतत सुधारणा करणे आवश्यक आहे. संस्थेचा व पर्यायाने स्वतःचा फायदा कशामुळे करता येईल. यासाठी आपल्या दृष्टीकोनात बदल होणे आवश्यक आहे. 21 व्या शतकात तंत्रज्ञानात आमुलाग्र बदल झाले आहेत. कार्पोरेटचे युग आले आहे. ग्राहकांचे महत्व वाढले आहे. घरबसल्या बँकिंग व्यवहार, वस्तूची आयात होत असून ऑनलाईन पद्धतीचा अवलंब मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे विद्यार्थांनी गुगलवर आवश्यक माहिती आत्मसात केली पाहिजे, असे मत संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपुरकर यांनी व्यक्त केले. येथील प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अंड कॉम्प्युटर स्टडीज आयोजित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपक्रमांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते. तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि भावी संधी कोणत्या, या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.
परदेशी भाषा आत्मसात करा..
ते पुढे म्हणाले, नवनवीन शिकण्याची ध्यास अंगिकारावा. नाविन्याचा ध्यास घ्यावा. शारीरिक, मानसिकदृष्ट्या सशक्त झाले पाहिजे. येणार्या काळात कल्पकतेला महत्व राहणार आहे. यासाठी शिक्षणाबरोबर एखादी परदेशी भाषा आत्मसात करणे. काळाचीच गरज निर्माण झाली आहे. संगणक आदी क्षेत्रातील नवीन घडामोडी आत्मसात केले पाहिजे. त्यासाठी ध्येय निर्मिती चिकाटी, अथक परिश्रम आवश्यक असून मिळालेल्या संधीचे सोने करण्याची क्षमता हवी, असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा
भविष्याची चाहुल आजच घ्या…
परिसंवादाचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा म्हणाले, विद्यार्थ्यानो तुम्ही कोण आहात, याचे स्वताच आत्म परीक्षण करा कोणतीही गोष्ट अशक्य नाही, सर्व काही शक्य आहे. त्याची सुरुवात स्वतःपासूनच करा. स्पर्धेचा प्रवाहाबरोबर वाहिलात तरच उज्वल भवितव्य भविष्यात असेल. तुमच्यातील कौशल्य तुम्हालाच सिद्ध करावे लागणार आहे. भविष्याची चाहूल आजच लक्षात घ्या व जागे राहून आई-वडिलांची स्वप्नाची पूर्तता करा. या परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी कमला शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा होते. यावेळी व्यासपीठावरती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य डॉ. जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. पौर्णिमा कदम, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वनिता कुर्हाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवसीय परिसंवादाचे राज्यभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ डॉ. ज्योती ओरा (मुंबई), (इम्पक्ट ऑफ टेक्नोलॉजी अ बायोकेमिस्ट पस्पेक्टीव्ह) मनीष सिंग व अंशू कुमार, दिल्ली, (इंटरनेट ऑफ थिंगस) अभिजित घोळे (मशीन लर्निंग, साजिद पठाण (डाटा अन्लीटीक्स) संजयकुमार (क्लाउड कॉम्पुटिंग), डॉ. दीपक वोरा (व्यक्तीमत्व विकास), डॉ. सचिन कदम (सायबर सिक्युरिटी) बिनॉय जाफर (न्याचरल लँग्वेज प्रोसेसिंग), डॉ. अजयकुमार (नेट्वर्किंग) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे यांनी केली. सूत्रसंचालन समन्वयक प्रा. निलांबरी काळे व जेन्सी मथ्यू यांनी केली तर आभार उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे यांनी मानले.