नाविन्याचा ध्यास हाच ‘जनशक्ति’चा श्‍वास

0

दैनिक जनशक्ति’च्या 63व्या वर्धापनदिनानिमित्त आपणा सर्वांशी संवाद साधतांना आमच्या मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. खरं तर सहा दशकांचा कालखंड हा खूप मोठा असून यात समाजाच्या सर्व स्तरांमधील जनतेच्या हितासाठी ‘जनशक्ति’ची भूमिका ही सातत्याने महत्वाची राहिल्याचे आम्ही नम्रपणे नमुद करत आहोत. वर्धापन दिनानिमित्त प्रसिध्द करण्यात येत असलेल्या विशेषंकासाठी ‘परिवर्तन: गती, प्रगती आणि अधोगती’ ही संकल्पना घेण्यात आली आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असल्याचे नेहमी म्हटले जाते. ते त्रिकालबाधीत सत्यदेखील आहे. या पार्श्‍वभूमिवर गत एक वर्षात आपल्या भोवतालच्या परिवर्तनाचा मागोवा या अंकात घेण्यात आला आहे. यात अर्थातच परिवर्तनातून आलेली गती आणि त्यातून साधलेली प्रगती आणि अर्थातच काही प्रमाणातील अधोगतीला याला प्राधान्य देण्यात आले आहे. आपल्याभोवती घडणार्‍या विविध घटनांचे अतिशय तटस्थपणे वार्तांकन करण्याचे काम आम्ही केले आहे. याचमुळे जनशक्तिने सर्वसामान्यांच्या हृदयात आदराचे स्थान प्राप्त केले आहे.

तंत्रज्ञानाची कास
आज स्मार्टफोनच्या माध्यमातून अतिशय स्वस्त आणि वापरण्यास सुलभ मात्र प्रचंड परिणामकारक साधन आपल्या हातात आले आहे. याला सोशल मीडियाची जोड मिळाली असल्याने पारंपरिक मीडीयाला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अर्थात प्रसारमाध्यमांना काळाच्या आव्हानावर मात करत टिकून राहण्यासाठी नव्याचा स्वीकार करणे आवश्यकता आहे. अर्थात काळाची ही पावले ओळखत जनशक्तिने नव्या तंत्रज्ञानाला आत्मसात केले आहे. एका अर्थाने नव्या आव्हानांच्या लाटेवर स्वार होत यातील अनुकुल बाबींचा जनशक्तिला नवीन आयाम देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. जनशक्ति आधीपासूनच ई-पेपरच्या स्वरूपात उपलब्ध असला तरी या वर्षात आम्ही अत्यंत गतीमान असणारे न्यूज पोर्टल कार्यान्वित केले आहे. यात अगदी हायपर-लोकल म्हणजेच्या खान्देशच्या कान्याकोपर्‍यातील बातम्यांसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील वृत्तांचा प्राधान्य देण्यात आले आहे. एका अर्थाने ‘ग्लोकल’ म्हणजेच ग्लोबल आणि लोकल या दोन्ही संकल्पनांचा मिलाफ जनशक्तिच्या वृत्तांकनात करण्यात येत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या हिताच्या प्रश्‍नांना कायम प्राधान्य देतांना आम्ही तंत्रज्ञानातील नवनवीन प्रवाहांना समर्पित असणारे तब्बल अर्धे पान प्रकाशित करत आहोत. देशातील कोणत्याही भाषिक वर्तमानपत्रात तंत्रज्ञानाला दररोज इतके प्राधान्य क्वचितच दिलेले असेल. याचा विचार करता जनशक्तिने नाविन्याचा स्वीकार केल्याचे आम्ही नम्रपणे नमूद करत आहोत.

क्युआर कोड व माध्यमांचा मिलाफ
मुद्रीत व डिजीटल माध्यमांना समान प्राधान्य देणारा ‘हायब्रीड मीडिया’ ही काळाची गरज बनली आहे. पारंपरिक आणि अत्याधुनिक माध्यमाला जोडणारा दुवा म्हणून क्युआर कोडचा सर्वप्रथम वापर करण्याचा बहुमान जनशक्तिने मिळवला आहे. काही इंग्रजी वर्तमानपत्रांनी मर्यादीत प्रमाणात याचा आधी वापर केला असला तरी थेट बातम्यांमध्ये क्युआर कोड टाकून त्याच्या व्हिडीओवर रिडायरेक्ट करण्याचा पॅटर्न भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये पहिल्यांदा जनशक्तिनेच आणल्याची बाब आम्ही अभिमानाने आपल्यासमोर मांडत आहोत. या माध्यमातून स्मार्टफोनच्या मदतीने पहिल्यांदाच छापील आणि डिजीटल माध्यमे कनेक्ट करण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला असून अनेक स्थानिक घटनांना या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. येत्या कालखंडात क्युआर कोड आणि व्हिडीओ कंटेंटचा विपुल वापर करण्याचा आमचा मानस आहे. याशिवाय अत्याधुनीक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपला भोवताल जनतेसमोर नाविन्यपूर्ण पध्दतीने मांडण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत. यातील सर्वच बाबी आपल्यासमोर मांडता येणार्या नसल्या तरी लवकरच आर्टीफिशियल इंटिलेजियन्स म्हणजे कृत्रीम बुध्दीमत्ता, सोशल मीडिया, कस्टमाईज्ड अ‍ॅप्लीकेशन्स आदींच्या माध्यमातून आपणासमोर जनशक्तिचा नवीन चेहरा येणार आहे. क्युआर कोड प्रमाणे या बाबीदेखील प्रसारमाध्यमात क्रांतीकारक आणि पथदर्शी ठरतील हा आशावाद नक्कीच आहे.

जनहिताची कळकळ
‘दैनिक जनशक्ति’ कधी काळी समाजवादी चळवळीचे मुखपत्र राहिलेले आहे. प्रस्थापितांच्या विरूध्दचा बुलंद आवाज म्हणून आमच्या दैनिकाची असणारी ख्याती काळाच्या ओघात जराही लयास गेलेली नाही. अनेक बाबींवर आम्ही घेतलेला पवित्रा योग्य असल्याचे सिध्द झाले आहे. विशेष करून गत वर्षी मनीष भंगाळे या फेकरने कथितरित्या दाऊद इब्राहिमचे कॉल प्रकरण समोर आणले असता देशातील मीडियाने त्याला डोक्यावर घेतले होते. भंगाळेच्या दाव्यातील फोलपणा ‘जनशक्ति’ने पुराव्यानिशी सादर केला होता. त्याच्याविरूध्द भूमिका घेणारे जनशक्ति हे देशातील एकमेव वर्तमानपत्र होते हे विशेष. आमच्या गौप्यस्फोटामुळेच त्याला जळगावातल्या पत्रकार परिषदेतून पलायन करावे लागले होते. यानंतर काही महिन्यांनी मनीष भंगाळेला झालेली अटक आणि त्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपपत्रातील गांभिर्य पाहता ‘जनशक्ति’च्या भूमिकेवर न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे सर्व जण म्हणतात म्हणून एखादी भूमिका घेण्याचे काम आम्ही कधीही केलेले नाहीय. तर नेहमी सत्याची बाजू घेण्याची आमची कायम भूमिका राहिली आहे. आगामी काळातही याच सत्याच्या वाटेवरून आमची वाटचाल होईल ही ग्वाही वर्धापनदिनानिमित्तम आम्ही देत आहोत. आजवरच्या वाटचालीत आमचे वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांनी आमच्यावर भरभरून प्रेम केले आहे. हा लोभ भविष्यातही कायम रहावा ही अपेक्षा आणि परिवर्तनाच्या सकारात्मक दिशेने पाऊल टाकण्यासाठी
खूप शुभेच्छा!

कुंदन ढाके
मुख्य संपादक,
दैनिक जनशक्ति