पुणे । ‘नावीन्यपूर्ण संशोधनात आपण मागे आहोत. त्यामुळे त्याला सर्व पातळ्यांवर प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शोध हीच भारताची ताकद असून, नावीन्यपूर्ण संशोधनाला पूरक वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केले. डेंग्यू आजाराचे कमी खर्चात आणि केवळ 15 मिनिटांत निदान करणार्या ‘डेंग्यू डे वन टेस्ट किट’ची निर्मिती करणार्या डॉ. नवीन खन्ना यांना जावडेकर यांच्या हस्ते अंजनी माशेलकर इन्क्ल्यूजिव्ह इनोव्हेशन अवार्ड’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. 8 राज्यांमधील एकूण 18 संशोधकांना जावडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे (पीआयसी) आयोजित नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन’ परिषदेचे उद्घाटन जावडेकर यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. पीआयसीचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर, ‘इंटरनॅशनल लाँन्जिव्हिटी सेंटर, जयंत उमराणीकर, ‘पीआयसी’चे मानद संचालक प्रशांत गिरबने, अंजली राजे याप्रसंगी उपस्थित होते.
शिक्षण विकासाचे साधन
शिक्षण हेच विकासाचे महत्त्वाचे साधन अहे. नावीन्यपूर्ण संशोधनाच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसून तीच संशोधनाची ताकद आहे. डॉ. खन्ना यांचे संशोधन हे मेक इन इंडिया’चे उत्तम उदाहरण आहे. मेक इन इंडिया’ची संकल्पना केवळ भारतात उत्पादन करण्यापुरती मर्यादित नसून भारतातच संशोधन करून त्यात गुंतवणूक होऊन तयार उत्पादन अभिमानाने विक्रीस यावे, असे त्यात अभिप्रेत आहे, असे जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
स्वच्छता बाळगा
संशोधनाचा फायदा थेट लोकांपर्यंत पोहोचला का, याचा विचार व्हायला हवा, असे माशेलकर यांनी सांगितले. डेंग्यू बरा झाल्यानंतर पुन्हा या आजाराची लागण झाल्यास ते गंभीर ठरू शकते. त्यामुळे पुन्हा परतून येणार्या डेंग्यू संदर्भात विशेष काळजी घ्यायला हवी. या आजाराविरूद्ध सरकार काय पावलं उचलतं, हे पाहत बसण्यापेक्षा नागरिकांनी आपापल्या पातळीवर पुरेशी सार्वजनिक स्वच्छता बाळगणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले, असे डॉ. खन्ना यांनी सांगितले.