नाशिक। सध्या नाशकात लाठ्या काठ्यानिशी नागरिक सज्ज झाल्याचे दिसते. याचे कारण म्हणजे पिसाळलेला कुत्रा. नाशकातल्या सिडकोतील राजरत्ननगर भागात पिसाळलेल्या कुत्र्याने महाराष्ट्रदिनी लहान मुलांसह तब्बल 20 नागरिकांना चावा घेत जखमी केले. या घटनेमुळे सतर्क झालेल्या शेकडो नागरिकांनी एखादा जंगली प्राणी पकडावा तसे हाती लाठाकाठ्या घेत रस्त्यावर उतरून तीन-चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर कुत्र्याला जेरबंद केले. त्याला महापालिकेच्या ताब्यात देण्यात आल्यानंतरच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सोमवारी लहान मुले सुटीचा आनंद घेत होते. कोणी चौकात, कोणी गल्लीत तर कोणी आपल्या घरासमोर खेळत होते. याचवेळी सप्तशृंगी चौक, दुर्गा चौक भागात अचानक एक पिसाळलेला श्वान आला. त्याने प्रथम त्याने सहा वर्षांच्या मुलाच्या गुडघ्याजवळ लचके तोडले. हा प्रकार पाहून नागरिकांनी काठीने श्वानाला हाकलले. मात्र, त्याने पुढे जाऊन दीड वर्षाच्या मुलीला लक्ष्य केले. त्यानंतर या पिसाळलेल्या श्वानाचा जो धुमाकूळ सुरू झाला, तो धक्कादायक होता. जो अडवायला जाईल, त्याच्यावर कुत्रा हल्ला करीत असल्याने पळापळ झाली. श्वान थेट लचके तोडत असल्याने अखेर एखाद्या जंगली श्वापदाला मारण्याची तयारी करावी, त्याप्रमाणे अनेकांनी आपल्या हातात लाठ्या-काठ्या घेतल्या आणि सुरू झाली त्याला पकडायची मोहीम. काही नागरिकांनी नगरसेविका रत्नमाला राणे यांना हा प्रकार कळवला. नगरसेवक नीलेश ठाकरे, सामाजिक कार्यकर्ते भूषण राणे, संदीप पवार, अमोल कदम यांच्यासह एकता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी जखमी नागरिकांना रुग्णालयात नेले. नगरसेविका राणे यांनी तत्काळ महापालिका अधिकार्यांशी संपर्क साधून श्वान पकडणारे वाहन बोलावून घेतले. पिसाळलेल्या श्वानाला पकडण्यात नागरिकांना यश आल्यामुळे अनेक नागरिक जखमी होण्यापासून वाचले.