नाशिक: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी देशपातळीवर घेण्यात येणार्या नीट परीक्षेस बसलेल्या नाशिकच्या विद्यार्थांचा रविवारी गोंधळ उडाला. परीक्षार्थींच्या प्रवेशपत्रावर चुकीचा पत्ता असल्यामुळे नाशिकच्या विद्यार्थांना मनस्ताप सहन करावा लागला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून प्रवेशपत्रावरील झालेल्या चुकीमुळे परीक्षेला बसलेल्या सुमारे 150 ते 200 विद्यार्थांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. नाशिकमधील नीट परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राच्या ठिकाणी मुंढेगाव असा उल्लेख असल्याने हे विद्यार्थी सकाळी इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथे पोहोचले. ही परीक्षा सकाळी 9.30 वाजता सुरू होणार असल्याने या परीक्षेसाठी विद्यार्थी याठिकाणी वेळेत पोहोचले.
मात्र, अशा प्रकारची कोणतीही परीक्षा या ठिकाणी नसल्याने तसेच येथे कोणतेही परीक्षा केंद्र नसल्याचे समजताच या विद्यार्थी गोंधळून गेले. या विद्यार्थांनी तात्काळ प्रवेशपत्रातील पत्यातील इतर सुचनांप्रमाणे पेठरोड येथील एकलव्य स्कूल येथील परीक्षा केंद्र गाठले. या केंद्रावर विद्यार्थांना पोहचण्यास उशीर झाला. प्रवेशपत्रातील या घोळामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. या गोंधळामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रवेशपत्रावर चुकीचा पत्ता, निश्चित परीक्षा केंद्राची शोधाशोध, परीक्षेस सुरुवात झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर पोहचणे, परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला जाणे, हा प्रकार अनेकदा राज्यातील विविध परीक्षेबाबतदेखील घडल्याचे पाहायला मिळाले आहे. याप्रकारामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्याचे मानसिक खच्चीकरण होते. पुन्हा त्या परीक्षेची नव्याने तयारी, परीक्षा फॉर्म पुन्हा भरणे तसेच पुन्हा नव्या उमेदीने परीक्षेचा अभ्यास करणे हे या विद्यार्थांना क्रमप्राप्त ठरतेच. परंतु त्या विद्यार्थ्याचे वेळ, श्रम व पैसा देखील वाया जातो. अशा प्रकारचा अनुभव राज्यातील विद्यार्थांना काही नवीन नाही. नीटच्या परीक्षेत पुन्हा एकदा विद्यार्थांना याच गोंधळाचा सामना करावा लागला आहे. यामुळे आता केंद्रीय परीक्षा मंडळाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.