नाशिक: नाशिकच्या महापौरांनी नाशिकमधील पावसाळ्याच्या पार्श्वभूमिवर केलेला पूस्थितीचा दावा खरा ठरला आहे. केदारनाथमध्ये आलेल्या जलप्रलयाची आठवण करुन देणारी परिस्थिती दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पाहायला मिळाली. पण नाशिकमध्ये आलेला पूर नैसर्गिक आहे की मानवनिर्मित असा सवाल निर्माण झाला आहे. कारण नाशिक महापालिकेने गेल्या 24 तासात ड्रेनेजमधून तब्बल 46 टन प्लॅस्टिक कचरा गोळा केला आहे.
पर्यावरणप्रेमींचाही दुजोरा
पावसाळ्यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व कामांचा डांगोरा पिटणार्या महापालिकेवर सर्वत्र टीकेची झोड उठली होती. मात्र पावसानंतरच्या 24 तासांत नालेसफाई करताना महापालिकेने ड्रेनेज, नाले, ओढ्यांमध्ये अडकलेला तब्बल 46 टन कचरा गोळा केला. यामुळे महापौरांनी केलेला दावा खरा होता का असा सवाल निर्माण झाला आहे. प्लास्टिक कचर्यामुळेच नाशिकमधली पूरस्थिती गंभीर झाल्याचा दावा खुद्द महापौरांनी केला होताच, पण पर्यावरणप्रेमींनीही आता हेच म्हटले आहे.
पूरस्थिती बिकट होणार
नाशिककर दररोज 3 ते 4 टन प्लॅस्टिक कचरा टाकतात अशी महापालिकेची आकडेवारी सांगते. पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार लग्नाचं जेवण असो की दैनंदिन जीवन, ‘यूज अँड थ्रो’च्या नावाखाली प्लॅस्टिक सर्रासपणे वापरलं जातंय. दीड लाख पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि अनेक टन प्लॅस्टिक पिशव्या, वस्तू रोज कचरा म्हणून नाशिककर फेकून देतात. हाच कचरा पुढे जाऊन ड्रेनेज, नाले, ओढ्यांमध्ये अडकतो आणि अतिवृष्टीच्या काळात पाण्याच्या विसर्गाला जागा न मिळाल्याने पूरस्थिती बिकट होते.