नाशकात मुलाला वाचवताना पिता गतप्राण

0

नाशिक । सिडको परिसरातील हनुमान चौकात राहणारे अनिल भुजबळ यांचा विजप्रवाहचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. रविवारी रात्री जेवणानंतर त्यांचा मुलगा घरातून बाहेर आला घरासमोरच्या विद्यूत खांबाच्या तारेला त्याने धरले. संततधार पावसामुळे तारेमध्ये वीजप्रवाह उतरला होता. अरिहंतला धक्का लागल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखून त्वरित अरिहंतला बाजूला ओढले मात्र यावेळी वीजप्रवाहचा जोरदार झटका भुजबळ यांना बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

महावितरणवर नागरीकांना संताप
अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळपासूनच सिडकोत संततधार पाऊस सुरू होता. अरिहंतनेे घरासमोरच असलेल्या विदयुत खांबाला आधारासाठी लावलेल्या तारेला हात लावला. दुर्देवाने या तारेमध्ये वीजप्रवाह उतरला होता. वडीलांनी धाडसाने त्याला बाजूला ओढले. याचवेळी तेदेखील विजप्रवाहच्या धक्क्याने घराच्या लोखंडी जिन्यापर्यंत फेकले गेले. या जिन्यातही वीजप्रवाह उतरला असल्याने त्यांचा भाऊ संतोष यांनी अनिल यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यांना परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी अनिल भुजबळ यांना मयत घोषित केले. या घटनेमुळे सिडकोतील रहिवाशांनी महावितरणच्या गलथान कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पावसाळ्यापुर्वी करावयाची दुरुस्तीची कामे लक्षपुर्वक केली जात नसल्याने आणखी किती लोकांचे बळी गेल्यावर महावितरणला जाग येईल,की प्रत्येक मुद्द्यावर जनक्षोभ वाढण्याचीच हे अधिकारी वाट पाहतात, असा संताप शहरात व्यक्त होतो आहे.