नाशिकचा कनिष्ठ लेखा परीक्षक नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात

1

ग्रामपंचायत लेखापरीक्षण सकारात्मक अहवालासाठी स्वीकारली सहा हजारांची लाच

नंदुरबार- तालुक्यातील कोठली खुर्द ग्रामपंचायतीच्या 2016-17 या वर्षाचा लेखा परीक्षण सकारात्मक अहवाल देण्यासाठी सहा हजारांची लाच मागणार्‍या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लेखा परीक्षक राजेश संपतराव वाघ (52, नाशिक रोड, नाशिक) यास नंदुरबार एसीबीने रंगेहाथ अटक केली. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास धुळे-नंदुरबार चौफुलीवर पथकाने सापळा रचून वाघ यांना अटक केली. या कारवाईने भ्रष्टाचारी अधिकार्‍यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

सापळा रचून केली अटक
कोठली खुर्द ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व हल्ली होराफळी, ता.अक्कलकुवा येथे कार्यरत तक्रारदाराने नंदुरबार लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली होती. 2016-17 या वर्षातील लेखा परीक्षण अहवाल सकारात्मक देण्यासाठी नाशिकच्या स्थानिक निधी लेखा परीक्षण कार्यालयातील कनिष्ठ लेखा परीक्षक राजेश संपतराव वाघ यांनी सहा हजारांची मागणी केली होती तर प्रत्येक लेखा परीक्षक हे ग्रामपंचायतीच्या दप्तर तपासणीवेळी एक टक्के रकमेची मागणी करतात, असे तक्रारदारानेही सांगितले होते. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीवरील नीलेश प्लाझासमोरील रोडवर तक्रारदाराकडून लाच घेताना वाघ यांना अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
नंदुरबार एसीबीचे उपअधीक्षक शिरीष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक करुणाशील तायडे, निरीक्षक संगीता पाटील, हवालदार उत्तम महाजन, संजय गुमाने, दीपक चित्ते, मनोज अहिरे, संदीप नावाडेकर, अमोल मराठे, मनोहर बोरसे, ज्योती पाटील, सचिन परदेशी आदींनी ही कारवाई केली.