नाशिक- नाशिकमधील इगतपुरी येथील मिस्टिक व्हॅलीमध्ये रविवारी रात्री आयपीए व आयएएस अधिकार्यांची 13 मुले बारबालांसोबत नंगानाच करत असतांना पोलिसांनी पकडले, मात्र सोमवारी त्या सर्वांना ताबडतोब जामीन मंजूर करण्यात आला. या कारवाईनंतर पोलिसांना अनेक आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांचे फोन येऊ लागले. त्यामुळे अटक केलेल्यांना लवकर जामीन मिळावा यासाठी पोलिसांवर दबाव आला असे मानले जाते.
नाशिकच्या महामार्ग परिसरात मिस्टिक व्हॅली हे रिसोर्ट आहे. या रिसोर्टमधून नाच गाण्यांचा आवाज येत असल्याची माहिती इगतपुरी पोलिसांना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी कर्मचार्यांचे खास पथक घेत मिस्टिक व्हॅलीवर छापा टाकला. पोलिसांना पाहताच डिस्कोवर नाच करणार्या तरुण – तरुणींच्या पायाखालची वाळूच सरकली. अवघ्या काही मिनिटांत पोलिसांनी सर्वांच्या मुसक्या आवळत पोलीस ठाण्यात आणले. तर अटक केलेल्या 10 बारबाला मुंबईतील आहेत. ही डिस्को पार्टी सांताक्रूज येथील धमेंद्रकुमार दिनेशकुमार सिंग याने आयोजित केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पृथ्वीराज युवराज पवार, सुमित श्रीराम देवरे, कौस्तुभ विश्वास जाधव, सुंशात जिभाऊ गांगुर्डे, ललित सुनील पाटील, शब्बीर आजीमखान या अटक करण्यात आलेल्या तरूणांची नावे आहेत. पैकी ललित पाटील हा पिंपरी चिंचवडचा तर शब्बीर, आजीमखान हा ठाण्यातील काशिमिरा येथील आहे. उर्वरित सर्व जण नाशिकमधील आहेत.
या पार्टीत तरुण-तरुणींनी अल्कोहोल आणि ड्रगचे सेवन केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे तसा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. असे असताना या आरोपींना त्वरीत जामीन मंजूर करण्यात आला आहे. हे सर्व मुले पुणे, ठाणे, औरंगाबाद, नंदुरबार येथील आयएएस, आयपीएस आणि उच्चपदस्थ अधिकार्यांचे नातेवाईक आहेत.