नाशिकजवळ भीषण अपघातात 11 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

11 passengers died in a horrific accident near Nashik नाशिक :  खाजगी प्रवाशांची वाहतूक करणार्‍या ट्रॅव्हल्स व टँकरमध्ये झालेल्या धडकेने खाजगी लक्झरी बस पेटल्याने साखर झोपेत असलेल्या 11 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर 28 प्रवासी जखमी झाले. हा भीषण अपघात नाशिक-औरंगाबाद महामार्गावरील नांदूरनाका येथे शनिवारी पहाटे सव्वापाच वाजता घडला. दरम्यान, अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली असून जखमींवर शासकीय खर्चातून उपचाराची घोषणाही केली आहे.

प्रवासी झोपेत असतानाच अपघात
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी पहाटे सव्वा पाच वाजता धडक झाली व अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने 11 प्रवासी होरपळून जागीच मृत्यू पावले तर 28 वर प्रवासी जखमी झाले आहेत. हीबस यवतमाळ येथून बस मुंबईकडे जात असल्याचे सांगण्यात आले.

अर्धा तास सुरू होती आग
घटनास्थळी अग्निशमन दलाची तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे प्रवासी जळून खाक झाले. सदर अपघातानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन टँकर रस्त्याच्या कडेला थांबला. सदर अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बस मधून हलविण्यात आले.

मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातत मृत पावलेल्या मयतांच्या वारसांना पाच लाख रुपये मदत व जखमींवर शासकीय खर्चातून उपचाराची घोषणा केली आहे.

भविष्यात असे अपघात टळण्यासाठी व्हाव्यात उपाययोजना
यवतमाळहून मुंबईच्या दिशेनं येणार्‍या खासगी बसला औरंगाबाद-नाशिक मार्गावर अपघात होऊन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या
नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. अपघातातील जखमींना वैद्यकीय उपचार व मृतांच्या नातेवाईकांना सरकारने आर्थिक मदत करावी. भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती व प्रवाशांचे मृत्यू टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे विरोध पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले आहे.