नाशिकफाटा येथील ‘हिंजेवाडी’ दिशादर्शकास फासले काळे

0

वाकड : महापालिकेने नाशिक फाटा येथील चौकात ‘हिंजवडी’चे ‘हिंजेवाडी’ असे नामकरण करीत दिशादर्शक फलक लावला होता. याबाबतचे व्रृत पुढारीमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर हिंजवडीकरांनी महापालिकेच्या भोंगळ कारभारावर सडकून टीका केली. युवकांनी त्या फालकास काळे फासून महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला.

नोटिसा देवूनही घेतली नाही दखल
आयटी हबमुळे जगाच्या नकाशावर ओळख मिळवलेल्या हिंजवडीचा चुकीचा उल्लेख स्थानिकांसाठी मोठे डोकेदुखी ठरत आहे. आयटी स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात कंपन्यांतील काही उच्चदस्थ अमराठी अधिकार्‍यांनी हिंजेवाडी असा नामोल्लेख सुरु केला. त्यामुळे बहुतांश कंपन्या, इंटरनेट तसेच बँकिंग क्षेत्रातहि हिंजेवाडी असाच उल्लेख केला जाऊ लागला. सुरुवातीला छोटी वाटणारी चूक काही वर्षातच हिंजवडीकरांची मोठी डोकेदुखी ठरू लागली. हिंजेवाडी या चुकीच्या नामोल्लेखाच्या वाढत्या वापरामुळे स्थानिकांची अस्मिता दुखावली गेली. त्याविरोधात मागील दोन वर्षापासून हिंजवडीकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंजवडी ग्रामपंचायतीने देखील सर्व कंपन्यांना नोटीसा देत बदल करण्याच्या सक्त सूचना केल्या. नोटीसानंतर काही दिवसातच हिंजवडीतील सर्व कंपन्यांनी आपली चूक सुधारून हिंजवडी असा उल्लेख करण्यास सुरुवात केली आहे.

हिंजवडी ग्रामस्थ आक्रमक
हिंजेवाडी या चुकीच्या नामोल्लेखामुळे एवढे रान पेटेल असतानाही महापालिकेने तीच चूक पुन्हा केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या नामोल्लेखाबाबत हिंजवडी ग्रामपंचायतीच्यावतीने महापालिकेस पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे. तरी देखील नाशिकफाटा येथील फलकावर पुन्हा हिंजेवाडी असा उल्लेख केल्याने हिंजवडीकर आक्रमक झाले होते.

हिंजवडीच्या अस्मितेशी खेळू नका : साखरे
‘हिंजवडी’ हे नाव समस्त हिंजवडीकरांची अस्मिता असून त्याच्या कुणीही खेळू नका असा इशारा हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे यांनी दिला आहे. ते म्हणाले हिंजेवाडी या चुकीच्या नोमोल्लेखाविरोधात या पूर्वी अनेक आंदोलन करण्यात आली आहेत. एवढी आंदोलन होत असताना देखील महापालिकेने घोडचूक केल्याने पालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.