नाशिक/अहमदनगर । सध्या राज्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील बहुंताश धरणे निम्म्यापेक्षा अधिक भरली आहेत. नाशिक विभागातील प्रकल्पांत 40 टक्के साठा झाला आहे. परंतु, विदर्भ, मराठवाडा अद्यापही कोरडा असून तेथील धरणांमध्ये केवळ 20 टक्के जलसाठा आहे. नाशिक विभागात नाशिक व नगरमधील धरणांच्या क्षेत्रात पावसाचा जोर रविवारीही कायम होता. काही धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोकणात धरणांमध्ये 84 टक्के पाणीसाठा आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी काठावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नांदूर माधमेश्वर धरणातून 49192 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गंगापुर धरणातून सकाळी 10 वाजता 10278 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दारणा धरणातून 16875 क्युसेक, कडवा धरणातून 7466 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
कोयना धरणाने ओलांडली सत्तरी
कोयना धरण क्षेत्रात सुरू असणार्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सध्या धरणात 70.07 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरणाने सत्तरीचा टप्पा पार केल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे. या पाणीसाठ्यापैकी उपयुक्त साठा 65.07 टीएमसी आहे, तर पाणी उंची 2130 फूट झाली आहे. धरण भरण्यासाठी 35 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
पूर परिस्थिती कायम
कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम आहे. सध्या पंचगंगेची पातळी स्थिर राहिली असल्याने पंचगंगेवरील शिवाजी पूल दुचाकींसाठी दिवसभर खुला करण्यात आला होता. जिल्ह्याच्या पश्चिम भागात, विशेषत: धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पन्हाळा तालुक्यातील 14 गावांना अद्याप पुराचा वेढा आहे. 150 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटलेलाच आहे.
जायकवाडी धरण
पाणीपातळी : 1505.03 फूट
सध्याची पाणीपातळी : 458.734 मी.
आवक : 46183 क्युसेक