पाचोरा ( प्रतिनिधी ) : पाचोरा येथे उत्तर प्रदेश बॉर्डर जवळील सतना येथे जाणारे नाशिक येथील औद्योगिक वसाहतीत विविध ठिकाणी काम करणारे ५० कामगार प्रवास करतांना आढळल्याने त्यांना दि १८ एप्रिल रोजी उपविभागीय अधिकारी पाचोरा यांच्या आदेशाने भडगाव रोड वरील शक्तीधाम हॉल येथे क्वारंटाईन(आयसोलेशन कक्षात) करण्यात आले आहे. त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था गादी, सतरंजी,पांघरूण,पिण्याच्या पाण्याचे जार आदींची व्यवस्था पाचोरा नगरपरिषद,उपविभागीय अधिकारी कार्यालय, महसूल विभाग,पोलीस प्रशासन,आधारवड संस्था व शक्तीधाम हॉल यांच्या सहकार्याने करण्यात आली आहे.
या ठिकाणी नगरपरिषदेच्या वतीने फायर फायटरद्वारे सर्व भाग निर्जंतुक करून सदर प्रवाशांना येथे ठेवण्यात आलेले असून कायम, २४ तासासाठी ८-८ तासाच्या अंतराने ३ स्वच्छता कर्मचारी देखील नेमलेले आहेत. शक्तीधाम येथे आरोग्य निरीक्षक धनराज पाटील हे सातत्याने नजर ठेऊन असून दिवसातून ३ वेळा आपल्या सहकार्यासोबत पाहणी करत अहवाल वरिष्ठांना सादर करीत आहेत. या बाबत सर्व कार्यवाही उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली यावेळी नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, कर अधीक्षक दगडू मराठे, वाहन चालक, दत्तात्रय पाटील, गोपाल लोहार, आकाश खैरनार, बापू जाधव आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.