नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा आणि कळवण तालुक्यात दूषित पाण्यामुळे फोफावणाऱ्या गॅस्ट्रो या आजाराची साथ बळावली आहे. सुरगाण्यातील राहुडे गावात गॅस्ट्रोची लागण झाल्याने आतापर्यंत तीन ज्येष्ठ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लागण झालेल्या रुग्णांना तातडीने आरोग्य सुविधा पुरवितानाच गावात तातडीने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू करा, असे निर्देशही जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत.
हे देखील वाचा
सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथील सुमारे १५० जणांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. काही रुग्णांवर सुरगाण्यातच तर काहींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नामदेव मोतीराम गांगुर्डे (वय ६०) या रुग्णाचा रविवारी (८ जुलै) रोजी मृत्यू झाला.त्या पाठोपाठ बुधवारी (दि.११) रोजी बशिरा पांडू लिलके (वय ६०) आणि सीताराम जीवा पिठे (वय ६२) या दोन रुग्णांनीही जीव गमावल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या वाढू लागल्याने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी बुधवारी सुरगाणा तालुक्यात धाव घेतली. राहुडे गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तहसीलदारांसह जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
दूषित पाणी पिल्याने गॅस्ट्रोची लागण झाल्याचा निष्कर्ष प्रशासनाने नोंदविला असून, तातडीने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत. गावात टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करतानाच नवीन बोअरिंग करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गावात आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले असून, रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.