मुंबई : हेवी ब्रेक सिस्टिम असलेली मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे मार्गासाठीची अद्यावत लोकल मुंबई मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली आहे. कर्जत ते लोणावळा आणि कसारा ते नाशिक घाटामध्ये या लोकलच्या चाचण्या महिन्याभरात घेतल्या जाणार आहेत. चाचण्या यशस्वी ठरल्यास मुंबई-नाशिक आणि मुंबई-पुणे लोकल सेवा सुरू होईल. त्यामुळे या मार्गावरून दैनंदिन प्रवास करणार्या प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.
मुंबई ते नाशिक आणि पुणे या मार्गावर मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मुंबई-नाशिक लोकल सेवा सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे. त्या अनुषंगाने मध्य रेल्वेने तांत्रिक अभ्यास केला. रेल्वेच्या रिसर्च स्टॅण्डर्ड अॅण्ड डिझाइन ऑर्गनायझेशननेही (आरडीएसओ) मुंबई-नाशिक मार्गाची गेल्या वर्षी पाहणी केली. कसारा-इगतपुरीदरम्यानचा घाट हाच नाशिकपर्यंत लोकलसेवा सुरू करण्यातील मुख्य अडथळा असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे, तसेच अन्य तांत्रिक अडचणीही आहेत, असे निरीक्षण आरडीएसओच्या अधिकार्यांनी त्यावेळी नोंदवले होते. यानंतर मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे घाटमार्गांवर चालवण्यासाठी अधिक सक्षम ब्रेक यंत्रणा असलेल्या लोकलची मागणी केली होती. त्यानुसार चेन्नई येथील इंटिग्रल कोच कारखान्यात अशी अद्ययावत लोकल तयार करण्यात आली. सामान्य लोकलमध्ये 16 ब्रेक असतात, मात्र या लोकलमध्ये 32 ब्रेक आहेत. या लोकलची चाचणी घाटमार्गांवर लवकरच घेतली जाणार आहे.