डॉ. अरविंद मोरे हत्याप्रकरण; पायांच्या ठश्यांबाबतचा अहवाल लवकरच रेणार
जळगाव । शहरातील पार्वतीनगरात झालेल्या कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.अरविंद सुपडू मोरे यांचा धारदार करवतीने गळा चिरुन हत्या झालेल्या घटनास्थळाची मंगळवारी नाशिक येथील फॉरेन्सिक लॅब पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. यातच त्या ठिकाणी आढळुन आलेले पायांचे ठशांचे नमुने पथकातील तज्ज्ञांनी घेतले असून त्यात डॉ. मोरे यांच्यासह दुसर्रा कुणाचे पायांचे ठसे तर नाही, याचा शोध पथकाकडून घेतला जाणार आहे. त्याबाबतचा अहवालही जिल्हा पोलिस दलाला लवकरच देण्यात येईल.
घरात गळा चिरून हत्येचा संशय
काही महिन्यापूर्वीच मोरे यांची धुळे येथून जळगावात बदली झाली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चालक जालिम जाधव मोरे यांना घरी घेण्यासाठी आल्यावर त्यांचा गळा चिरून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती. यानंतर पोलिस प्रशासनातर्फे पुराव्यासाठी वेगवेगळ्या पध्दतीने तपास करण्यात येत आहे. यातच मंगळवारी हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक रवाना झाले असून त्याठिकाणी जाबजबाब घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. तर धुळे तसेच नंदुरबार येथेही पोलीस पथकांचा सर्व पातळीवरून तपास सुरू आहे. डॉ. मोरे यांचा खून करण्यात आला, ही शक्यता तपासातून समोर येत आहे, परंतु अजून त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. नाशिक येथे गेलेल्या स्थानिक गुन्ह्याच्या पथकाने डॉक्टर मोरे यांच्याशी संबंधीत एकाची भेट घेऊन त्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले. धुळे येथे गेलेल्या पथकाने ते वास्तव्यास होते त्या परिसरात जाऊन माहिती जाणून घेतली. नंदुरबार येथेही पोलिसांनी शोध मोहीम राबविली. पोलीसचक्रे खुनाच्या धागेदोर्यांपर्यंत पोहोचले असल्याचा अनुमान लावला जात आहे. दरम्यान प्रशिक्षणार्थी आयपीएस नीलोत्पल यांनी यासदर्भात माध्यमांशी बोलताना सांगितले की, पोलीस पथक धुळे, नाशिक येथे रवाना झाले असून तपास सुरू आहे. नातेवाईकांच्या माहितीनुसार डॉ. अरविंद मोरे यांचे सर्कल लिमिटेड होते. ते खूप कमी वेळ भेटत असत तसेच कमी बोलत. खून झाला त्या घटनास्थळी न्याय वैद्यक प्रयोग शाळेच्या अभ्यासकांनी रक्ताचे नमुने घेतले आहेत.