नाशिक, मुंबई पथकाने घेतले नमुने

0

जळगाव- शिरसोली रस्त्यावरील श्यामा फायर वर्क्स या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी दुपारी स्फोट होवून दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या स्फोटाबाबत बुधवारी रात्री उशिरापर्यंत नाशिक फॉरेन्सीक लॅब तज्ञ व मुंबईच्या स्फोटक तज्ञांकडून कसून तपासणी करण्यात आली. यानंतर तेथून पथकाने स्फोटातील तसेच फटाक्यांच्या स्फोटक मिक्सींग खोलीतील नमुने घेतले.

शिरसोली जवळ असलेल्या शामाफायर वर्क्स या फटाका कारखान्यामध्ये स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. यात राजेंद्र तायडे व हेमंत जयस्वाल हा कामगाराचा मृत्यू झाला. या स्फोटामुळे कारखान्यातील सुरक्षितेबाबत प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीसांनी घटनेची चौकशी सुरु केली आहे. तपासधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल खंडागळे यांच्यासह पथकाने अनेकांचे जाबजबाब घेतले. दिवसभर कामावर असलेल्या कर्मचार्‍यांचे वेगवेगळ्या माध्यमातुन जबाब घेण्यात आले. तसेच गुरूवारी देखील खडांगळे यांनी कारखान्याला भेट देत कामगारांचे जबाब नोंदवून घेतले.

मुंबईच्या एक्सप्लोझिव्ह पथकाने घेतले नमुने
बुधवारी दिवसभर मुंबईचे एक्सप्लोसिव्ह विभागातील कंट्रोलर सिनीराज, एस.रायचौधरी ह्या दोघांनी शामा फायर वर्क्स येथे येवून स्फोटातील काही नमुने घेतले. यामध्ये स्फोट होण्यासाठी लागणारे पोटॅशिअमसह अन्य चार पावडरचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. काराखान्यातील प्रत्येक स्फोटक मिक्सींग खोलीतुन त्यांनी नमुने घेतले. सकाळी 10 वाजेपासुन ते सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत मुंबईच्या स्फोटक विभागाच्या तज्ञांकडून कसून तपासणी सुरु होती.

नाशिक फॉरनसिक सायन्स लॅबकडून तपासणी
नाशिक येथील गृह विभागाची फॉरनसिक सायन्स लॅबची व्हॅन एम. एच. 02 टी.9799 जळगावात दाखल झाली. यामध्ये वैज्ञानिक साहाय्यक ए.व्ही.गाडगे, सहाय्यक वैज्ञानिक प्रमोद पवार यांच्यासह चालक व दोन अधिकारी दुपारी 2.30 वाजेपासुन शामाफायर फटाके कंपनीत दाखल झाले. त्यांनीही उशिरापर्यंत चौकशी करुन स्फोट झालेल्या रुमजवळील काही नमुने संकलीत केले.

 कंपनीतील सुरक्षितेचाही घेतला आढावा
नाशिक व मुंबई येथील पथकाने फटाका कारखान्यातील सुरक्षितेच्या दृष्टिने असलेल्या उपाय योजनांची देखील काटेकोरपणे माहिती घेतली. सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांनी कंपनी चालकांना तोंडी सुचनाही दिल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, फटाका कारखान्यात तहसिलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात येणार आहे.