नाशिक शहरात पारा 8 अंशावर घसरला

0

नाशिक । शहरासह जिल्हा पुन्हा थंडीने गारठला आहे. यंदाच्या मोसमात दुसर्‍यांदा नाशिकचा पारा 8 अंशापर्यंत खाली घसरला आहे. पारा घसरल्याने नाशिककरांना थंडीची तीव्रता जाणवली. राज्यात सर्वाधिक कमी तपमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली असून, निफाडमध्ये पारा 7 अंशपर्यंत खाली घसरला आहे. थंडी वाढल्याने पहाटे जॉगिंग ट्रॅकवरील फेरफटका मारणार्‍यांची गर्दी रविवार असूनही फार कमी होती.

राज्यातील कमी तापमानाची नोंद
काही दिवसांपूर्वी शहराचे किमान तपमान 10 अंशाच्या पुढे सरकलेले होते. यामुळे बोचर्‍या थंडीपासून नागरिकांना काही अंशी दिलासा मिळाला होता. मात्र, शनिवारपासून पुन्हा तपमान घसरू लागल्याने थंडीच्या तीव्रतेतही वाढ होऊ लागल्याने नाशिककरांकडून शेकोट्यांचा आधार घेण्यास सुरूवात झाली. 10.6 अंशापर्यंत वर सरकलेला पारा थेट 8 अंशापर्यंत खाली आला आहे. निफाड तालुका सर्वाधिक गारठला असून, तेथील तपमान 7 अंशापेक्षाही खाली घसरले आहे. संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांनी स्वत:ला बंदिस्त करुन घेतल्याचे दिसून आले. पहाटेही थंडी मोठ्या प्रमाणात जाणवत होती. थंडीत वाढ झाल्याने दिवसभर हवेत गारवा कायम असतो. डिसेंबर अखेर थंडीने नाशिककरांना तीव्र तडाखा दिला होता. कडाक्याच्या थंडीने नाशिककरांना हुडहुडी भरली होती. हंगामातील निच्चांकी 7.6 अंश इतकी किमान तपमानाची नोंद 29 डिसेंबरला झाली होती. मात्र, किमान तापमानाचा पारा या आठवड्यात दोनवेळा पुन्हा वर सरकल्याने थंडीची तीव्रता कमी होण्यास मदत होणार असल्याची आशा नागरिकांकडून व्यक्त होत होती. परंतु, पुन्हा तपमान कमालीचे घसरू लागले. आज तर 8 अंशावर पारा आल्याने राज्यात सर्वाधिक थंडीचे शहर म्हणून नाशिकची नोंद झाली आहे.