मुंबई-विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघात टीडीएफमधील मतविभाजनाचा फायदा शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांना मिळाला. दराडेंनी निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीचे संदीप बेडसेंचा २४ हजार ३६९ मतांनी दणदणीत पराभव केला. पहिल्या फेरीपासूनच दराडेंनी बेडसे यांच्यावर आघाडी घेतली होती.
भाजप तिसऱ्यास्थानी
विजयासाठी आवश्यक असलेला २३ हजार ९९० मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण न करू शकल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. या मतदारसंघासाठी विक्रमी ९२.३० टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली होती. भाजपाचे अनिकेत पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. हा मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्यात शिवसेना यशस्वी झाली.
कोटा पूर्ण नाही
मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर दराडे यांना सर्वाधिक १६,८८६ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे बेडसे यांना १०,९७० मते मिळाली. भाजपाचे अनिकेत पाटील ६,३२९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तर टीडीएफचे भाऊसाहेब कचरे ५,१६७ मतांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. दराडे यांना सर्वाधिक मते मिळूनही विजयासाठी आवश्यक असलेला कोटा त्यांना पूर्ण करता आला नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतमोजणी सुरू करण्यात आली.
किशोर दराडे नुकताच विधान परिषदेवर शिवसेनेकडून निवडून गेलेले आमदार नरेंद्र दराडेंचे बंधू आहेत. तर भाजपाचे अनिकेत पाटील हे माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे पुत्र आहेत.