‘नासाका’वर लिलावाचे संकट गडद झाले

0

नाशिक । येथील नाशिक सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक मदत शासनाकडून मिळविण्यासाठी दिलेले एनओसी जिल्हा मध्यवर्ती बँकेने रद्द ठरविली. यामुळे ‘नासाका’वरील लिलावाचे संकट गडद झाले आहे. परिणामी नासाका सुरू व्हावा, यासाठी वर्षभरापासून जोरदार प्रयत्न करणार्‍यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजकारणाच्या खेळीत नासाकाचा बळी
नासाकाला आर्थिक मदतीचे गाजर दाखवयाचे व दुसरीकडे जिल्हा बँकेला नासाकावर लिलावासारख्या कायदेशीर कारवाईचा बडगा उचलण्यास भाग पाडण्यार्‍या सहकारमंत्र्यांनी एका अर्थाने नासाकाच्या बॉयलरमध्येच पाणी ओतले आहे. या राजकारणाच्या खेळीत नासाकाचा बळी गेल्यास भाजपच्याच प्रतिमेला तडा जाणार आहे. जिल्हा बँकही वसुलीअभावी आर्थिक अडचणीत सापडल्याने या बँकेला यातुन बाहेर आणण्यासाठी सहकार खात्याने कडक उपाययोजना आखल्या आहेत.जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत नासाकाच्या लिलावाच्या ठरावास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच जिल्हा बँकेने नासाकाला दिलेली एनओसी लिलावाच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला होता.मात्र गुरुवारी जिल्हा बँकेने नासाकाला दिलेले एनओसी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आता नासाका लिलावाचा मार्ग मोकळा झाला आहे.आता जिल्हा बँक नासाकाच्या लिलावाची कायदेशीर प्रक्रिया कोणत्याही क्षणी पार पाडण्याची शक्यता आहे. नासाकासह जिल्ह्यातील निसाकाचे मूल्य निर्धारण पुण्यातील मिटकॉन या कंपनीद्वारे जिल्हा बँकेने यापूर्वीच केलेले असून, या कंपनीने आपला अहवाल जिल्हा बँकेकडे सुपूर्दही केला आहे.