वाशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने नवीन सूर्यमालेचा शोध लावला आहे. नासाच्या ‘केप्लर स्पेस’ या दूर्बिणद्वारे हा शोध घेण्यात आला असून, हे नासाचे मोठे यश मानले जाते. या नवीन सूर्यमालेत एकूण 8 ग्रह असून, ते नवीन सूर्यमालेत एकाच तार्याभोवती फिरत आहेत. या तार्याचे नाव ‘केप्लर 90’ असून, त्याभोवती चार ग्रह फिरताना दिसत आहेत, असे नासाने नमूद केलेले आहे. पृथ्वीप्रमाणेच एखादा ग्रह या सूर्यमालेत आहे का? याचा अद्याप शोध लागला नसून, ही नवी सूर्यमाला पृथ्वीपासून 2 हजार 545 प्रकाशवर्षे दूर आहे. या सूर्यमालेचा व्हिडिओदेखील जारी करण्यात आलेला आहे.
आपल्यापेक्षा 30 टक्क्यांनी मोठी सूर्यमाला
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातली बातमी दिली असून, त्यासंदर्भात बोलताना अॅण्ड्रयू व्हेंडरबर्ग या खगोलशास्त्रज्ञाने सांगितले, की नवीन सूर्यमाला आपल्या सूर्यमालेपेक्षा 30 टक्क्यांनी मोठी आहे. सर्वांनाचा या सूर्यमालेला भेट द्यायला आवडेल अशी ही सूर्यमाला असल्याचेही त्यांनी सांगितले. या सर्व संशोधनाबाबत नासाकडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी नवीन सूर्यमालेचे काही फोटो व व्हिडिओ नासाने आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत. आपल्या सूर्यमालेप्रमाणेच येथे छोटे ग्रह तार्यापासून जवळ आहेत तर मोठे ग्रह तार्यापासून दूर आहेत. तेथील तापमान माणसाला सहन होणार नाही इतके जास्त आहे, असेही खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले.