मुंबई : मुंबईची लाईफ-लाईन असलेल्या लोकल रेल्वेवरुन मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला चांगलेच झापले. नासा जर अवकाशातून जमिनीत पुरलेले बॉम्ब शोधू शकते, तर चांद्रयान पाठवणारे आपले शास्त्रज्ञ रेल्वे रुळांवरचे तडे शोधू शकत नाहीत का? असा सवाल उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला विचारला. तसेच रेल्वे रुळांवरील तडे शोधण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घ्या, सर्व रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याबाबत विचार करा, असा सल्लाही न्यायालयाने दिला. याशिवाय मध्य आणि पश्चिम दोन्ही रेल्वे मार्गावरील संरक्षक भिंतींचे काम तातडीन पूर्ण करण्याचे आदेशही दिले. रेल्वे रुळाला तडे गेल्याने लोकल वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण, सध्या नियमित झाले आहे. सातत्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यामुळेच न्यायालयाने या सर्व सूचना केल्या आहेत.