नाहक दौरे काढण्यापेक्षा मुलभूत सुविधा द्याव्यात- नगरसेवक मयूर कलाटे

0

पिंपरी-चिंचवड : दौरे काढण्यापेक्षा शहरातील अत्यावश्यक मुलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागच्या सप्टेंबर महिन्यात गुजरात येथील अहमदाबाद येथे काही नगरसदस्य तेथील विकास कामे पाहण्यासाठी गेले होते. तेथील बीआरटी, नदी सुधार प्रकल्प पाहून आले. त्याचा किती फायदा शहरासाठी झाला हे आपल्या डोळ्यासमोरच आहे. शहरातील बीआरटीची अवस्था आणि नद्यांची अवस्था आपण पाहतच आहात. शेजारच्या पुणे महापालिकेने नदी सुधार प्रकल्पाअंतर्गत 700 कोटी रुपये केँद्र सरकारकडून आणले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील नद्यांसाठी महापालिकेने केंद्राकडून किती रुपये आणले हे सांगावे.

शाळांत सुविधा नाहीत, दौरे…!
आता दिल्ली येथे ई शाळा पाहण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकारी व नगरसदस्य दौरा चालू आहे. या दौर्‍शायाचे फलित काय आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. मनपाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला व्यवस्थित बाक नाहीत. पिण्याच्या पाण्याची सोय नाही, संडास-बाथरुमची सोय नाही. शिक्षक कमी आहेत. भौतिक साधने कमी आहेत. आणि ई शाळा तर फार दूरची गोष्ट आहे. त्यामुळे आहे त्या शाळाचं सुधारण्याची गरज आहे.

पाणी, कचरा, खड्डे, आजार..
शहरात आज मुलभूत सुविधांची वानवा आहे. कच-यांचा प्रश्‍न गंभीर आहे. दोन-दोन दिवस कचरा उचलला जात नाही. भर पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागते. नाहीतर पाणी माफियाकडून अव्वाच्यासव्वा दराने पाणी विकत घ्यावे लागते. मनपाचे सगळ्या प्रकारचे कर भरुन प्रामाणिक करदात्यांना नाहक भूर्दंड बसत आहे. शहरात भटकी कुत्री, डुकरे यांचा सुळसळाट झालेला आहे. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. सार्वजनिक वाहतुकीचे बारा वाजलेले आहेत.

रस्त्याची अवस्था तर रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते अशी झालेली आहे. शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. त्याच्यावर नागरिकांना लसी, गोळ्या मिळत नाहीत बाहेरुन घ्याव्या लागत आहेत. शहरातील इतके गंभीर प्रश्‍न सोडविण्याऐवजी दौरे काढून काय फायदा होणार आहे. आणि सत्ताधारी व प्रशासन हे शहर स्मार्ट सिटी करण्यास निघाले आहे. सत्ताधारी भाजप व प्रशासनाने या सुविधा जरी सोडविल्या तरी नागरिक त्यांना धन्यवाद देतील.