जळगाव । सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे चुलत भाऊ राजू नारायण पाटील (वय 42, रा.पाळधी, ता.धरणगाव) यांना महामार्गावर पाळधी बायपासवर अज्ञात वाहनाने उडविल्याने ते जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली. रविवारी दुपारी याच महामार्गावर मुसळी फाट्यावर मेहरुणमधील जावेद शेख या तरुणाला चिरडले होते. या महामार्गावर सलग दुसरा अपघात आहे.
धडकेत दुचाकी फेकली गेली लांब
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजू पाटील हे बांभोरी येथील जैन कंपनीत चालक म्हणून कामाला होते. सोमवारी पहिल्या पाळीत ते ड्युटीला होते. ड्युटी आटोपून ते दुचाकीने (क्र.एम.एच.19-2113) जळगाव शहरात आले. काम आटोपल्यानंतर घरी जात असताना पाळधी गावात जाणार्या रस्त्यावर (बायपास) समोरुन येणार्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला तर दुचाकी लांब फेकली गेली. या अपघातात पाटील जागीच गतप्राण झाले.
मंगळवारी सकाळी अंत्यसंस्का
राजू पाटील यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर पाळधी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रताप पाटील यांनी दिली. पाटील यांच्या पश्चात पत्नी लताबाई, मुलगा गौरव, भाऊ शिवाजी असा परिवार आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती .