ना. बापटांना लालदिव्याच्या गाडीतून पायउतार व्हावे लागेल

0

कामशेत/राजगुरूनगर । जरा विधानसभेत डोकावून पहा, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांच्या मुळेच आज महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आहे. या आमदारांनी जरा हात वर केले तर तुमच्या लाल दिव्याच्या गाड्या रस्त्यात बंद पडतील व तुम्हाला पाय उतार व्हावे लागेल. आपण पालकमंत्री आहात काय बोलतो याचे भान ठेवा असा सल्ला अजित पवार यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना दिला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सडक्या आंब्याची उपमा देणार्या बापट यांच्या विधानाचा समाचार अजित पवार यांनी घेतला. ते मावळातील कामशेत येथे हल्लाबोल आंदोलनात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मदन बाफना, धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, शशिकांत शिंदे, विश्‍वास देवकाते, चित्राताई वाघ, जालिंदर कामठे आदी उपस्थित होते. भाजप सरकार मनुवादी विचारांचे असून ते जाती जातीत, धर्मा धर्मात वाद निर्माण करुन मनुस्मृतीचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा हल्लाबोल अजित पवार यांनी केला. सुनील तटकरे म्हणाले, भाजपा सरकारने जनतेला खोटी आश्‍वासने दिली, शेतकरी कर्जाच्या बोजाने आत्महत्या करत आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, दहावीच्या पुस्तकात राजकीय पक्षांची चिन्ह वापरत भाजपा पक्षाचे उदात्तिकरण करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. येत्या आठ दिवसात ही पुस्तके बदलली न गेल्यास रस्त्यावर उतरत मुख्यमंत्र्यांना मंत्रालयाच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा देखील यावेळी दिला.

खासदार आढळराव पाटील म्हणजे भूलभुलैय्या
कोरेगाव भीमा दंगलीचा मास्टर माईंड कोण आहे, हे जनता जाणते. भाजपा सरकारच्या काळात शेतकरी मालाला भाव नाही , शेतकर्‍याला कर्ज माफी नाही, जिल्हा बँक भरती थांबवली, शिक्षक भरती नाही, पोलिस भरती नाही, विजेची अवस्था वाईट करून ठेवली, आरोग्य सुविधा नीट नाही, व्यापारी लोकांचे जीएसटीने कंबरडे मोडले. सर्वच क्षेत्रात भाजप निष्क्रिय झाले असून या सरकारला आता सत्तेतून खाली खेचण्याची वेळ आली असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. हल्लाबोल आंदोलनाची पुणे जिल्ह्यातील तिसरी सभा राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव यांना टीकेचे लक्ष्य केले. फ्लेक्सबाजीत पुढे असलेला हा खासदार म्हणजे भुलभुलैय्या आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. या परिसराचा कायापालट शरद पवार यांनी केला. एमआयडीसी आणली. शेतीसाठी पाणी, विजेची सोय केली. एवढे करूनही खासदार मात्र राष्ट्रवादीच्या विरोधातील निवडून देता, याचे गणितच समजत नसल्याचे त्यांनी सांगितले.