भुसावळ। येथील आयुध निर्माणीत पावडर कोटिंग आणि पिनाका पॉड उत्पादन प्रकल्पास संरक्षण मंत्रालयाकडून मान्यता मिळाली आहे. त्यानुसार हा प्रकल्प सुरु करण्यात येत असून या दोन्ही प्रकल्पांचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर प्रकल्प सुरु झाल्याची घोषणा होईल.
दरवर्षी 450 पिनाका पॉडचे उत्पादन होणार
मल्टिबॅरल रॉकेट लाँचर प्रणालीचा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या पिनाका पॉड असेंब्लीचे उत्पादन भुसावळ आयुध निर्माणी कारखान्यात नुकतेच सुरू झाले आहे. ऍल्युमिनियमपासून बनवलेल्या या पॉडमधून 40 किलोमीटरपर्यंत रॉकेटचा मारा करणे शक्य आहे. येथे 2018 – 19 पासून प्रत्येक वर्षी 450 पिनाका पॉड असेंब्लीचे उत्पादन होणार असून 28 एकर जमिनीचे अधिग्रहण करुन उभारण्यात आलेल्या पिनाका पॉड असेंबल प्रणाली अंतर्गत पिनाका पॉड प्रकल्पाचे लोकार्पण होईल. कोलकोत्ता येथील ऑर्डनन्स बोर्डाचे उपाध्यक्ष, संचालक, व संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी प्रसंगी उपस्थितीत राहतील. संरक्षण राज्यमंत्री येणार असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे.
प्रकल्पासाठी 230 कामगारांची भरती केली जाणार
एका पॉडमध्ये सहा रॉकेट आणि असे दोन पॉड एका लाँचरवर असतात. पिनाका पॉडच्या प्रकल्पासाठी 230 कामगारांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी 181 औद्योगिक कामगार असतील. निर्माणीला 2015 – 16 मध्ये 50 पिनाका पॉड असेम्बली उत्पादनाचे उद्दिष्ट दिले होते. यापैकी 27 पिनाकाचे उत्पादन होऊ शकेल. त्यामुळे पुढील वर्षी बोर्डाद्वारे दिलेल्या 50 पिनाकाच्या उद्दिष्टासह एकूण 73 पिनाका पॉड असेंब्लीचे उत्पादन केले जाणार आहे. त्यानंतर 2017 – 18 मध्ये फेज टु ‘ए’ मध्ये 250 पिनाका आणि फेज टु ‘बी’ मध्ये 2018 – 19 मध्ये 200 च्या वाढीसह दरवर्षी 450 पिनाका पॉड असेंब्लीचे उत्पादन केले जाणार आहे.