जळगाव । राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकिय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गाळप हंगामांच्या शुभारंभ प्रसंगी जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेध राष्ट्रवादी कॉग्रेस महिला पदाधिकार्यांनी 5 नोव्हेंबर रोजी ना. गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर घोषणाबाजी करून त्यांचा फोटो असलेल्या होडींगला बुट व चपला मारून केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, जिल्हा सरचिटणीस मिनल पाटील, माजी नगराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, सोनाली देवळकर, वंदना राजपूत, वैशाली पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या. यावेळी महिलांनी ना. गिरीश महाजन यांच्या फोटो चिपकवलेले असलेल्या दारूच्या बाटल्या कार्यालयासमोर फोडल्या. साखर कारखान्याने उत्पादित केलेल्या दारूचे नाव बदलून ‘महाराजा’ ऐवजी ‘महाराणी’ ठेवण्याचा वादग्रस्त वक्तव्य करून सल्ला जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी भर सभेत केला आहे, हा महिलांचा अपमान केला असून महिलांचे नावे देण्यापेक्षा तुम्ही दारूच्या बॅ्रन्डला तुमचेच नावे द्या, देशात नरेंद्र मोदी राज्यात देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असतांना महिलांचे नाव देण्यापेक्षा यांच्यापैकी कोणाचेही नाव जरी दिले तरी दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होईल. ना. गिरीश महाजन यांनी केलेल्या व्यक्तव्याचा आम्ही सर्व महिला निषेध करीत आहे. ना. महाजन यांनी केलेल्या व्यक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही आंदोलनाचे पुढेचे पाऊल उचलू, असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकार्यांनी दिला.