गेल्या दीड वर्षांत मी कुठल्याही वृत्तवाहिनीवर चर्चेत भाग घेतला नाही. बुधवारी दीर्घकाळानंतर त्यात सहभागी झालो. ‘जय महाराष्ट्र’ वाहिनीवर संध्याकाळी झालेल्या या चर्चेत नारायण राणे हा विषय होता. कारण गेला आठवडाभर राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या झळकत आहेत. अर्थात ते नुसते अंदाज आहेत. कारण खुद्द राणे यांनी तशा बातम्यांचा साफ इन्कार केलेला आहे. पण एक दिवस आधी भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी असे वक्तव्य केले, की राणे यांच्या पक्षांतराची अनेकांना खात्री वाटू लागली. राणे भाजपमध्ये येणार काय, असा प्रश्न विचारला असता पाटील यांनी सूचक उत्तर दिले होते. ‘राणे सर्वच पक्षांना हवेेसे वाटतात.’ चंद्रकांत दादांच्या अशा उत्तराने राणे यांचा भाजपप्रवेशाचा मार्ग खुला झाला, असेच मग गृहीत धरले गेले. त्यातच दोन दिवसांनी राणे थेट दिल्लीला पोहोचले आणि ते भाजप श्रेष्ठींचीच भेट द्यायला गेले, असा निष्कर्ष काढला गेल्यास नवल नाही. कारण राणे यांनी आणखी एक वेगळे वक्तव्य केले होते. झाला तर भूकंप होईल, असे राणे म्हणाले होते. म्हणजेच ते काँग्रेसमध्ये भूकंप घडवणार असल्याचेही गृहीत होते. साहजिकच वाहिनीवरची चर्चा त्याच संदर्भात होती आणि बाकी सगळे आजीमाजी काँग्रेसजन त्यात सहभागी झालेले होते. खुद्द राणेपुत्र माजी खासदार नीलेश राणेंचाही त्यात सहभाग होता. मात्र, त्यांनीही चर्चेत काँग्रेस सोडण्याच्या बातमीचा साफ इन्कार केला. मात्र, आपण नाराज आहोत आणि पक्षात कुठलीही हालचाल नसल्याचेही विधान केले. यातली गोम अशी आहे, की माध्यमांना फक्त राणे वा अन्य कोणी एखादा पक्ष सोडून दुसर्या पक्षात जाणार काय, इतक्याच गोष्टीत रस असतो. पण कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता कशाला पक्षाचा त्याग करतो, याचा कधीच ऊहापोह होत नाही. की विश्लेषण होत नाही.
राणे हे व्यक्तिमत्त्व खूप आक्रमक आहे. आज तरी एकूण महाराष्ट्र काँग्रेस पक्षात त्यांच्याइतका आक्रमक व महत्त्वाकांक्षा असलेला अन्य कोणी नेता नाही. म्हणूनच या पक्षाचे महाराष्ट्रात काही भलेबुरे व्हायचे असेल, तर राणे यांच्याखेरीज कोणी त्यात पुढाकार घेणार नाही. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, की राणे यांच्या हाती पक्षाचे अधिकार नाहीत किंवा सूत्रेही नाहीत. पक्षाने काय करावे किंवा विरोधातले राजकारण कसे करावे, त्याचाही गंध बाकीच्या नेत्यांना नाही. परिणामी, विधानसभेत विरोधी पक्ष असूनसुद्धा, काँग्रेसची कुठलीही छाप राजकारणावर पडत नाही. राणे यांचे तेच दु:ख आहे. 1999 ते 2005 या कालखंडात त्यांनी शिवसेनेतर्फे विधानसभेत अतिशय प्रभावीपणे विरोधीनेता म्हणून भूमिका पार पाडलेली आहे. त्यामुळेच आजच्या क्षणी काँग्रेसने कसे सरकारला कोंडीत पकडावे, त्याचे भान त्यांच्या इतके कोणालाच नाही. अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना विरोधात बसण्याचा कुठलाही अनुभव नाही. तीच कथा अधिकृत विरोधी नेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटिल यांची आहे. म्हणून नारायण राणे चुळबुळत असतील, तर नवल नाही. भाजपमध्ये गेल्याने त्यांना मंत्रीपद मिळेल वा सत्तेच्या जवळ जाण्यासाठी राणे व्याकूळ झालेत, असल्या आरोपाला अर्थ नाही. हा माणुस स्वभावत: लढवय्या आहे. सत्तेत असो किंवा विरोधात असो, त्याला झुंजायला आवडते. आव्हाने पेलणे ही त्याची हौस आहे. म्हणूनच आजच्या प्रतिकूल स्थितीत काँग्रेसने राजकारणावर कशी छाप पाडावी, याविषयी राणेंचे काही आग्रह आहेत. पण पक्षाने त्यांना तशी संधीच नाकारली आहे. विधानसभेत नसल्याने राणेंना विरोधी नेतापद मिळू शकत नाही. पण त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी टाकली, तरी हा माणूस खुप धुमाकूळ घालू शकेल. पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संजीवनी आणू शकेल. पण तीच तर काँग्रेस श्रेष्ठींची अडचण आहे.
राणे हा स्वयंभू माणूस आहे. महत्त्वाकांक्षी आहे, तितकाच पुढाकार घेणारा आहे. तो खरोखरच महाराष्ट्रात काँग्रेसच्या मरगळलेल्या संघटनेत उत्साह निर्माण करू शकतो आणि रस्त्यावर कार्यकर्ते आणून प्रभाव पाडू शकतो. पण तसे केल्यास उरलेसुरले काँग्रेसचे उत्साही कार्यकर्ते राणेंच्या आहारी जाण्याचा धोका आहे. खेरवाडी वांद्रे-पूर्व येथील पोटनिवडणुकीत राणे जिंकण्याची अजिबात शक्यता नव्हती. कारण मुंबईभरचा शिवसैनिक तिकडे राणेविरोधात लोटणार, हे त्यांनाही कळत होते. पण आपल्यातली झुंजारवृत्ती सिद्ध करण्यासाठीच राणे पराभवाच्या जबड्यात उतरले होते. त्यानिमित्ताने त्यांनी मातोश्रीच्या परिसरात जाऊन मुंबईतल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना रणांगणात आणून उभे केले. निकालातही त्याचे प्रतिबिंब पडलेले होते. आठ महिने आधी तिथे काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा राणेंनी अठरा हजार अधिक मते मिळवून दाखवली. शिवसेनेलाही झुंजायला भाग पाडले होते. त्यातून राणे यांनी इच्छा असल्यास झुंजता येते आणि त्यातून पक्षात नवी जान ़फुंकता येते, याचीच ग्वाही दिली होती. पण त्याची पक्षात किती कदर झाली? ही काँग्रेसची समस्या आहे. तिथे लढणारा व स्वयंभूपणे उभा राहू शकणारा नेता कार्यकर्ता वर्ज्य आहे. राणे गाळातून काँग्रेसला बाहेर काढतील, याची श्रेष्ठींनाही खात्री आहे. पण तसे झाल्यास कार्यकर्ताही श्रेष्ठींपेक्षा राणेंच्या आहारी जाऊ शकतो. कार्यकर्ता व इच्छुक उमेदवारांना जिंकून देणारा आक्रमक नेता आवडत असतो. जे बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी करून दाखवले किंवा आंध्र अप्रदेशात 1999 सालात राजशेखर रेड्डींनी करून दाखवले. या दोन काँग्रेस नेत्यांनी तिथे घट्ट बस्तान बसवलेल्या पक्षांना पराभूत करून, आपले नेतृत्व सिद्ध केले होते. शून्यातून काँग्रेस पुन्हा उभी करणार्या या नेत्यांना काँग्रेसमध्ये काय स्थान होते? ममतांना पक्षातून बाहेर पडावे लागले आणि रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांच्या पुत्राची पक्षातून हकालपट्टी झाली.
काँग्रेसश्रेष्ठी म्हणजे राहुल गांधी होत. आजकाल सर्वाधिकार त्यांच्या हाती आहेत आणि त्यांना पक्षात आपल्याखेरीज लढणारा अन्य कोणीही असू नये, असे वाटते. किंवा लढणारा कोणी त्यांना नकोसा असतो. कालपरवा विधानसभेच्या निवडणुकीत सर्वत्र चमकणारे व अक्राळविक्राळ बोलणारे राहुल गांधी, निकालानंतर कुठल्या कुठे गायब झाले आहेत. पंजाबमध्ये अमरिंदरसिंग यांनी एकहाती पक्षाला यश मिळवून दिले. पण त्यांना निवडणूकपूर्व नेतेपद देण्यातही राहुलनी किती अडथळे आणले, त्याबाबतचा तपशील इथे पुन्हा सांगण्याची गरज नाही. नरेंद्र मोदींच्या एका घोषणेची नेहमी टिंगल झाली. ना खाऊंगा ना खाने दुंगा! तशीच राहुल गांधींचीही एक अघोषित भूमिका आहे. ‘ना लडुंगा, ना लडने दुंगा!’ ही आजच्या काँग्रेसची खरी समस्या आहे. ती समस्या प्रत्येक राज्यातल्या स्थानिक नेतृत्वाला व कार्यकर्त्यांना भेडसावताना दिसेल. गोव्यात वा मणिपूरमध्ये यश स्थानिकांनी मिळवले आणि त्याच्या पुढले निर्णय घेण्यात राहुलनी विलंब केल्याने, सत्तेपासून काँग्रेसला वंचित राहावे लागले. यशाच्याही जबड्यातून अपयश खेचून आणण्याची ही श्रेष्ठींची किमया, नारायण राणे यांना इथे सतावते आहे. त्यांना पक्षासाठी लढायचे आहे. आपल्याला काही मिळायचे असेल, तर ते काँग्रेसमधून मिळणार आहे. त्यासाठी काँग्रेसला यशस्वी करायला हा नेता झुंजायला उतावळा आहे. पण मिळणार्या यशापेक्षाही राणे स्वयंभूपणे यश मिळवतील अशी चिंता पक्षश्रेष्ठींना भेडसावते आहे. दुय्यम वा स्थानिक नेतृत्वाने कर्तबगारी दाखवली तर आपण कर्तृत्वहीन ठरणार, अशा भयाने पछाडलेल्या राहुलमुळे नाकर्ते लोक आज काँग्रेसचा कब्जा घेऊन बसले आहेत. म्हणूनच राणे यांच्यासारख्या महत्त्वाकांक्षी नेत्याची तिथे कुचंबणा झालेली आहे. आपल्या नेतृत्वगुणांना वावच नसल्याने नारायण राणे तिथे घुसमटलेले आहेत.