ना संघर्ष, ना संवाद फक्त अंत यात्राच!

0

‘शेतकरी’ नावाचा घटक हा सध्या फार संवेदनशील झाला आहे. या घटकाची संवेदनाच नष्ट करू पाहणार्‍या व्यवस्थेच्या विरोधात प्रचंड संताप क्षणाक्षणाला व्यक्त होतोय. कुठल्या न कुठल्या माध्यमातून व्यवस्थेवर रोज प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना शेतकर्‍यांच्या जीवावर होणारे राजकारण प्रचंड मोठ्या प्रमाणात फोफावत चाललेय. ’तूर घ्या तूर’ असा हॅशटॅग मागच्या आठवड्यात तुफान चालला. कर्जमाफीसाठी अभ्यास करू असे वारंवार म्हणणार्‍या मुख्यमंत्र्यांना या माध्यमातून अनेक सवाल केले गेले. तर याच आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या संघर्षयात्रेला उत्तर म्हणून संवादयात्रा काढण्याची घोषणा केली. संघर्षयात्रा प्रभावी ठरली की काय? असेही प्रश्न मग विरोधी पक्षाकडून येऊ लागले. संघर्षयात्रा निघाली त्यावेळी सत्ताधार्‍यांचा पीआर तगडा असल्याकारणाने एसी बस आणि जेवणाचे फोटो सोशल मिडीयात शेयर करून ’संघर्ष’ बोगस असल्याचे दाखवून देण्यात कुठलीही कसूर सोडली नाही. संघर्षयात्रेच्या धुराळ्यात बच्चू कडूंच्या आसूडयात्रेने देखील धुमाकूळ केला. या यात्रा पाहून न राहवून आता मुख्यमंत्र्यांनी ’संवाद’ यात्रा काढण्याचे प्रयोजन केलेय. निश्चितपणे महाराष्ट्रभर निघालेल्या या यात्रांनी शेतकर्‍यांचे चांगभलं व्हावं एवढीच व्यवस्थेचरणी प्रार्थना.

आज शेतकर्‍यांच्या समस्या आणि शेतकरी म्हटले की अनेक राजकीय पुढारी आणि पक्ष आधुनिक शेतीच्या गप्पा करतात. अर्थात आधुनिक आणि कमी खर्चात शेती होणे ही काळाची गरजच आहे. मात्र महाराष्ट्रातील अनेक टक्के शेतकर्‍यांची स्थिती ही आधुनिक शेती करण्याच्या लायक आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. आधुनिक शेतीची गरज खूप आधीपासून व्यक्त केली जात आहे. राजर्षी शाहू महाराज आधुनिक शेतीबद्दल फार इच्छुक होते. शेतीचा विकास करण्याऐवजी इंग्रजी राजवटीत लोक चाकरमानी होऊन शहरातील कारखान्यांकडे वळतात याची महाराजांना खंत होती. 15 ऑगस्ट 1920 साली कोल्हापूरच्या आर्य क्षत्रिय परिषदेचे अध्यक्षपद भूषविताना त्यांनी आधुनिक शेतीची गरज स्पष्टपणे सांगितली होती. ’नांगर व विहिरीचे पाणी काढण्याची मोट यांची सुधारणा, ही आजच्या प्रत्येक शेतकर्‍याचे हित करणारी आहे. सुधारलेले तंत्रविज्ञान शिकण्याच्या दृष्टीने कारागीर व शेतकर्‍यांनी पुढे आले पाहिजे. देशाच्या उद्योगधंद्यांच्या वाढीवर आपली प्रगती अवलंबून आहे. शेतीवर चालणारे कारागिरांचे उद्योगधंदे हेच या दृष्टीने उपयुक्त आहे’ असे ते त्यावेळी म्हणाले होते. आज आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेय, अर्थातच त्या मानाने उत्पादन देखील वाढत आहे. मात्र नैसर्गिक आपदांचे काय करायचे? हाही सवाल आहेच. आधुनिक शेतीच्या माध्यमातून भरघोस उत्पादन काढले जातेय मात्र त्या शेतीमालाला भावच मिळत नाही. अशा वेळी शेतकर्‍यांनी काय करायचं?. सांगायचं एवढच की शाहू महाराज असोत किंवा शिवाजी महाराज असोत त्यांच्या काळात देखील शेती व्हायची. शाहू महाराज आधुनिक शेतीच्या समर्थनार्थ होते. मात्र त्यांची प्रशासन व्यवस्था देखील शेतकरी हिताची होती. आज बिलकुल विपरीत परिस्थिती आहे.

शेतकरी आत्महत्या, नैसर्गिक विपत्ती, शेतीमालाला भाव या सगळ्या गोष्टी राजकीय लोकांना त्यांच्यासाठी केवळ एक मुद्दा बनवून पोळी भाजण्याच्या झाल्या आहेत. आपल्या सोयीप्रमाणे सत्ताधारी असो वा विरोधक हे पोळी भाजण्याचे काम निरंतर करत आलेले आहेत आणि सध्याही सुरु आहे. आज आधुनिक शेतीला महाराष्ट्रातील कृषक आंदोलनातील एक महत्वाचं नाव म्हणजे चंद्रकांत वानखेडे. त्यांनी आपल्या ’एका साध्या सत्यासाठी’ या पुस्तकात आपल्या लेखणीच्या माध्यमातून व्यवस्थेचे खरे रूप अगदीच व्यवस्थित ठेवलेय. त्यांनी एका लेखात म्हटलंय, ’बिकट परिस्थितीत शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे समंजसपणे व सहानुभूतीने पाहणे हे इतरांचे सामाजिक कर्तव्य ठरते. पण नेमका त्याचाच अभाव सगळीकडे दिसून येतोय. सहानुभूतीजनी चिंतनशील वृत्तीने शेतकर्‍यांच्या समस्येकडे पाहण्याऐवजी त्यांचे शोषण करून करून आपले उखळ पांढरे कसे करून घेता येईल असाच प्रयत्न व्यापारी, दलाल, राजकारणी, कर्मचारी करीत असतात. त्यामुळे शेतकर्‍यांचे जीवन पराकोटीचे हतलब झालेले दिसून येतेय. अशा व्यवस्थेत जो शेतीवर राबला आहे, ज्याला शेतीच्या व्यवसायाचा अनुभव आहे, तेथील परवड ज्याला माहित आहे असाच साहित्यिक, पत्रकार या वेदनेला शब्दस्वर देऊ शकतो असे चंद्रकांत वानखेडे यांनी म्हटलेय. त्यांचे हे वाक्य कालही त्रिकालबाधित सत्य होते, आजही आहे आणि उद्याही राहील यात तिळमात्रही शंका नाही.

शेती आणि शेतकरी या मुद्द्यावर स्वताला शेतीअभ्यासक अशी पदवी लावून मिरवणारे काहीजण व्यवस्थेच्या लॉलीपॉपला बळी देखील पडले आहेत. शेतकर्‍यांच्या व्यथेचा बाजार मांडून स्वताची पोळी भाजणारी ही एक विशिष्ट जमात देखील दुर्दैवाने इथे तयार होतेय. ही जमात लोकं सत्तेचा लॉलीपॉप चघळत आता सत्तेची भाषा करायला लागलीय. दुसरीकडे अमर हबीब, चंद्रकांत वानखेडे, विजय जावंधिया यांच्यासारखे काही जुन्या पिढीतले अभ्यासक शेतकरी समस्यांवर जीवाचे रान करताहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून ठराविक काही तरुणांचा गटदेखील शेतकर्‍यांसाठी प्रत्यक्ष कृतीतून उतराई होण्याचा प्रयत्न करतोय. पुण्यात होणारा ’तूर महोत्सव’ याचं एक उदाहरण म्हणता येईल. सोशल मिडीयाच्याच माध्यमातून मागे ’शेतकरी सन्मान परिषदे’च्या संकल्पनेखाली मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष काम झालेय. शेतकर्‍यांच्या पाठीशी कृतीशील पद्धतीने उभी राहणारी काही लोकं, संस्थाच आता आशेचा किरण आहेत. अर्थात या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर काम झाल्याशिवाय गत्यंतर नाही.

2014 साली विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी ’अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असे इमोशनल डायलॉगबाजी करत शेतकरी, बेरोजगार, अपंगांच्या भावनेचा खेळ करून भाजपने जबरदस्त बाजी मारली. ’सत्तेत येण्यासाठी काहीही’ याच मार्गदर्शक तत्वांनी हा विजय भाजपाने मिळवला. अर्थात या विजयामागे राष्ट्रवादी-काँग्रेस या दोन्ही तत्कालीन सत्ताधारी पार्टीचे दुर्लक्ष आणि बेजबाबदार रवैय्या होता हे देखील लक्षात घ्यावे लागणार आहे. ’अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ चांगल्या-वाईट अर्थाने आपल्या लक्षात आहेच. आता याच जाहिरातींचे तात्पर्य मात्र आजचे सरकार विसरलेय का? असा सवाल उपस्थित होतोय. शेतमालाचे कोसळलेले भाव, वाढत्या शेतकरी आत्महत्या, दुष्काळग्रस्तांच्या गेल्या वर्षातील मदतीचे रखडलेले वाटप, पीकविम्याची प्रतीक्षा आदींसह विविध ज्वलंत प्रश्ना शेती आणि शेतकर्‍यांपुढे असताना या अशा प्रकारच्या ’यात्रा’ शेतकर्‍यांना कितपत दिलासा देतील? हा प्रश्न चिंतनीय आहे. अर्थात हीच स्थिती आधीच्याही सरकारच्या काळात होती. म्हणजे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आता शेतकर्‍यानेच सक्षम होणे आवश्यक आहे कारण राजकारण्यांच्या कुठल्याही ’यात्रा’ शेतकर्‍यांच्या ’अंतयात्रा’ रोखू शकणार नाहीत, हे सत्य आहे.

– निलेश झालटे
9822721292