ना.सुरेश प्रभू 29 जुलै रोजी धुळ्यात

0

धुळे । प्रस्तावित मनमाड- धुळे – इंदौर रेल्वे मार्गासाठी ना.डॉ. सुभाष भामरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून मंजुरी मिळविली आहे. ह्या रेल्वे मार्गाची पुढील प्रक्रिया वेगाने कार्यान्वित व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसापासून ना. डॉ. सुभाष भामरे हे केंद्रीय रेल्वे मंत्री ना. सुरेश प्रभू यांना धुळे भेटीसाठी आग्रह करीत होते. त्यांच्या ह्या विनंतीला मान देऊन ना.सुरेश प्रभू 29 जुलै रोजी धुळ्यात येत असल्याची तसेच त्यांच्या उपस्थितीत रेल्वेमार्गाची आढावा बैठक होणार असल्याची माहिती ना.डॉ.सुभाष भामरे यांनी दिली आहे. गेल्या 30 वर्षात ना. सुरेश प्रभू हे पहिले रेल्वे मंत्री आहेत कि, जे धुळेवासीयांचे गेल्या अनेक वर्षा पासुनचे प्रलंबित असलेले मनमाड- धुळे-इंदौर रेल्वे मार्गाचे स्वप्नपूर्तीची भेट देण्यासाठी धुळे येथे येत आहेत. त्यासाठीच ना. डॉ. सुभाष भामरे यांनी ना. सुरेश प्रभू यांना प्रत्यक्ष धुळे येथे येऊन समस्त धुळेकर वासियांना ही अमूल्य भेट द्यावी म्हणून आग्रह धरला. व या आग्रहाचा मान राखून ना. सुरेश प्रभू हे 29 जुलै रोजी धुळे येथे येत आहेत.

कामास लवकरात लवकर सुरुवात
मनमाड – धुळे – इंदौर रेल्वे मार्गासाठी ना. डॉ. सुभाष भामरे यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालय, रेल्वेचे विविध अधिकारी तसेच मंत्री यांच्यासोबत वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा केला. त्यामुळेच समस्त धुळे वासियांचे हे स्वप्न साकार होत आहे. ना. सुरेश प्रभू हे सदरच्या धुळे बैठकी दरम्यान संबंधित रेल्वेच्या सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन या विषयासंदर्भात प्रगतीचा आढावा घेणार आहेत. तसेच मनमाड – धुळे – इंदौर रेल्वे मार्गाच्या कामास लवकरात लवकर सुरुवात होण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित रेल्वे अधिकार्‍यांना सूचना देखील करणार आहेत. गेल्या अनेक दिवसापासूनचा प्रलंबित असलेला मनमाड-धुळे- इंदौर रेल्वे मार्गाचा प्रश्न ना.डॉ. सुभाष भामरे यांच्या अथक प्रयत्नाने लवकरच मूर्त स्वरुपात येणार आहे.