यावल : पर्यटकांची निंबादेवी धरणावर होत असलेली गर्दी चोरट्यांनी कॅश करीत दोन मोबाईल दोन दुचाकी लांबवल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे जळगावातील पोलिस कर्मचार्याची याच धरणावरून दोन दिवसांपूर्वीच दुचाकी चोरीला गेल्याची घटना ताजी असताना पुन्हा दोन दुचाकी चोरीला गेल्याने टोळी कार्यरत झाल्याचा संशय आहे.
यावल पोलिसात गुन्हा
निंबादेवी धरणावर सोमवारी सकाळी तक्रारदार जुम्मा महेबूब तडवी (22, कोरपावली, ता.यावल) हे पर्यटनासाठी आल्यानंतर चोरट्यांनी आठ हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल तसेच चंद्रकांत आनंदा येवले (स्वामी विवेकानंद नगर, यावल) यांची 15 हजार रुपये किंमतीची हिरोहोंडा दुचाकी (एम.एच.19 ए.व्ही.6721) व यशवंत शांताराम पाटील (मांजरोद, ता.शिरपूर, ह.मु.चोपडा) यांची दुचाकी (एम.एच.18 ए.क्यू.7305) लांबवली. याबाबत सोमवारी रात्री यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक राजेंद्र पवार करीत आहेत.