निंबोलमधील अतिक्रमण हटवण्यासाठी आमरण उपोषण

0

घरकुलाच्या निधीद्वारे बांधकाम ; ग्रामसेवकावरही कारवाईची मागणी

रावेर- निंबोल येथील वेरसिंग बारेला यांनी शासनाच्या घरकुल योजनेचा निधी लाटून खाजगी प्लॉटवर केलेले अनधिकृत बांधकाम हटवावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर सोनार यांनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण छेडले आहे. वेरसिंग बारेला यांना सन 2015-16 मध्ये इंदिरा आवास योजने अंतर्गत घरकूल मंजूर झालेले होते. त्या अनुषंगाने त्यांना घरकुल बांधकाम हप्ता अदा करण्यात आला होता मात्र हे घरकुलाचे बांधकाम परमेश्वर दत्तु सोनार यांच्या खाजगी प्लॉट क्रमांक 47 मध्ये अवैधपणे करण्यात आल्याचा सोनार यांचा आरोप आहे. ग्रामपंचायत स्तरावरील तक्रार असल्याने या प्रकरणी गटविकास अधिकारी यांनी योग्य त्या कार्यवाहीसाठी ग्रामसेवकांना स्मरणपत्र दिले होते मात्र त्यानंतरही दखल घेण्यात आलेली नाही. गटविकास अधिकारी हबीब तडवी यांनी ग्रामसेवकांना अतिक्रमण काढण्यासाठी सहा स्मरणपत्रे दिल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांच्यावरही कारवाईची मागणी उपोषणकर्ते परमेश्वर सोनार यांनी केली आहे.