रावेर- तालुक्यातील निंबोल येथील विजया बँकेवर दरोड्याच्या इराद्याने आलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक करनसिंग नेगी हे जागीच ठार झाले आहेत. नेगी ठार झाल्यानंतर दुचाकीवरुन आलेले दरोडेखोर घटनास्थळाहून पसार झाले आहे. दरम्यान घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जिल्हा पोलीस अधीक्षकांसह अधिकार्यांचा ताफा निंबोलकडे रवाना झाल्याचे वृत्त्त आहे.
निंबोल येथील विजया बँकेचे शाखेवर दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास लुट करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरुन हेल्मेटधारी दोन दरोडेखोर आले. बंदुकीचा धाक दाखवित लुट करण्याच्या प्रयत्नात असताना बँकेतील सायरन वाजविण्यासाठी बॅकेच्या सहाय्यक व्यवस्थापक करनसिंग नेगी यांनी टेबलावरुन उडी मारली, प्रकार लक्षात आल्यावर दरोडेखाराने त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून नेगी यांच्या छातीत बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या. यानंतर पकडले जावू या भितीने दरोडेखोर घटनास्थळाहून सोबत आणलेल्या दुचाकीवरुन पसार झाले.
नेगी यांना तत्काळ बँकेतील कर्मचार्यांनी ओम सर्जिकल रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान भरदिवसाच्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
(काही वेळातच सविस्तर वृत्त)
(प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार बँकेचे कॅशिअर महेंद्र राजपूत काय म्हणाले बघा व्हिडीओ)