निंभोरावासीयांनी दिले जखमी मोराला जीवदान

0

निंभोरा । गावातील एका शेतात राष्ट्रीय पक्षी मोर अत्यवस्थ अवस्थेत आढळल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांसह वनविभागाच्या सहकार्याने त्याला वाचविण्यात यश आले. निंभोरा येथील शेत शिवारातील पंकज पवार यांच्या शेतात मंगळवार 8 रोजी एक मोर गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती भाजपाचे युवा कार्यकर्ते मनोज सोनार यांनी दीपक नगरे यांच्याशी संपर्क साधून दिली. गावात नेहमीच मोरांचा वावर दिसून आला आहे. मंगळवारी अशाचप्रकारे एक मोर आढळून आला मात्र त्याला ईजा झाली असल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी लागलीच याबाबत वनविभागाशी संपर्क साधून अधिकार्‍यांना माहिती दिली.

वनविभाग व पशुधन विभागाने रावेर येथे आणून केले उपचार
नगरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे आणि प्रभारी पशुधन सहाआयुक्त डॉ. उदय ओतारी यांच्याशी संपर्क साधल्याने दोन्ही विभागांनी तत्काळ दखल घेऊन नाकेदार विकास सोनवणे, विनोद पाटील, फकीरा तडवी, श्रीराम राठोड यांनी मोरास रावेर येथे आणून त्याच्यावर तातडीने उपचार केल्याने त्याचे प्राण वाचले.

सुरक्षेकडे लक्ष द्यावे
निंभोरा परिसरात वन्य प्राणी तसेच पक्षांचा वावर असल्याचे वारंवार आढळून येते. हे पक्षी गावालगत आल्यास त्यांचा शिकारीसाठी देखील प्रयत्न होत असतो. त्यामुळे वनविभागाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन वन्यप्राणी तसेच पक्षी रहिवासी भागात येणार नाही त्यादृष्टीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. पशू-पक्षांचे संरक्षण करणे ही या विभागाची जबाबदारीदेखील आहे.