निंभोरासीमला दरड कोसळुन दोन युवक ठार : एक जखमी

0

निंभोरासीमसह नायगावात शोककळा : एक जण सुदैवाने बचावला

रावेर : तालुक्यातील निंभोरासीम गावाजवळील भोकरी नदीपात्राजवळ उंच दरड कोसळल्याने 20 वर्षीय दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, 7 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने निंभोरासीम व नायगाव गावात मोठी खळबळ उडाली आहे. दीपक सवर्णे (20, निंभोरासीम) व सुशांत मराठे (22, नायगाव) अशी मयतांची नावे असून या घटनेत समाधान कोळी (नायगाव) हे देखील जखमी झाले असून गोपीचंद सपकाळे बचावले आहेत.

दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू
गळ काढण्यासाठी निंभोरासीम-विटवा रस्त्यावरील गट नंबर 46 वरील शासकीय बरड येथे दीपक सवर्णे (20, निंभोरासीम), सुशांत मराठे (22), समाधान कोळी (20, दोघे रा.नायगाव, ता.मुक्ताईनगर) व गोपीचंद सपकाळे (रा.सुनोदा) हे साथीदारांसह एका वाळू ठेकेदारासाठी गळ काढण्याच्या कामासाठी मंगळवारी सकाळी निंभोरासीमला आले होते. गळ काढत असतांना अचानक वरुन दरड खाली कोसळल्याने दीपक सवर्णे, सुशांत मराठे हे जागीच ठार झाले तर समाधान कोळी हे जखमी झालेत तर गोपीचंद सपकाळे हे सुखरूप बचावल्याचे सांगण्यात आले. रावेर ग्रामीण रुग्णालयामध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. रुग्णालयाबाहेर नातलग व गावकर्‍यांची मोठी गर्दी झाली होती. जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील, प्रल्हाद पाटील, राजू सवर्णे, गणेश चौधरी यांनी भेट देत माहिती जाणून घेतली.

अवैध वाळू वाहतुकीचे केंद्र
निंभोरासीम, ता.रावेर या गावाजवळुन तापी नदी वाहते. गावानजीक नदीपात्र मोठे असल्याने मोठा गौण खजिनाचा तेथे साठा असून दरोरोज दिवसा-ढवळ्या येथून अवैध वाळूसह खडीची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. आस-पासच्या गावाच्या युवकांना वाळू माफियावाले पैशांचे लालच दाखवून यांचा गौण खनिजाचा उपसा व वाहतूक करण्यासाठी वापर करीत आहेत. महसूल विभाग मात्र यांच्यावर अंकुश ठेवण्यात सपशेल अपयशी ठरला आहे.