भुसावळ : रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणार्या दुचाकी बाजूला घ्याव्यात, असे सांगितल्याचा राग आल्याने तालुक्यातील निंभोरा बुद्रूक गावातील हॉटेल त्रिमूर्तीजवळ चौघांना मारहाण करून हवेत पिस्टलातून दोन फैरी झाडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर संशयीत आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले होते मात्र पोलिसांच्या विविध पथकाद्वारे त्यांचा कसून शोध सुरू होता. रविवारी पहाटे आरोपी रेल्वेने भुसावळात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कुणाल अहिरे उर्फ डायमंड व अन्य दुसरा त्याचा साथीदार सुनील गोपाळ उमरीया (27, रा. पीओएच कॉलनी, भुसावळ) यांना अटक केली. आरोपींना न्यायालयाने 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
रेल्वे स्थानकावरून आवळल्या मुसक्या
दोघे आरोपी नाशिक येथून रेल्वेने भुसावळात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी पहाटे तीन वाजता सापळा लावून आरोपींना अटक करण्यात आली. डीवायएसपी गजानन राठोड, निरीक्षक कुंभार, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व पोलिस कर्मचार्यांनी रेल्वे स्थानकाच्या बाहेर ही कारवाई केली.
आरोपींना न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी
पोलिसांनी रविवारी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर शुक्रवारपर्यत अर्थात 13 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. न्यायालयात पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी गुन्ह्यातील पिस्टल व अन्य पसार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी गरजेची असल्याचा युक्तीवाद केला. दरम्यान, गोळीबार प्रकरणातील अन्य संशयीतांची नावे आता पोलिस कोठडीत निष्पन्नहोवून असून त्यानंतर त्यांनाही लवकरच अटक केली जाणार आहे.
किरकोळ कारणावरून वाद विकोपाला
महामार्गावरील हॉटेल त्रिमूर्तीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर कुणाल अहिरे उर्फ डायमंड व त्यांच्या सात मित्रांनी रस्त्यावर त्यांच्या दुचाकी आडव्या लावल्या असता शेख हुसेन शेख चाँद यांनी त्या बाजूला घ्याव्यात, असे सांगितल्याचा राग आल्याने वाद उफाळला. संशयीत कुणाल व त्याच्या सोबतच्या मित्रांनी शेख हुसेन शेख चाँद, लखविंदरसिंग जसवींदर सिंग सनसोय यांना शिवीगाळ करीत मारहाण केली तर त्यांचा मित्र शरीफ शहा आरमान शहा भांडण सासेडवण्यात आल्यानंतर त्यासही मारहाण झाली.