केळीसह मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली : वीज तारांसह खांबही वाकले
निंभोरा : येथे व परीसरात आलेल्या बुधवारी दुपारी आलेल्या जोरदार चक्रीवादळासह पावसामुळे 10 ते 12 किलोमीटरच्या पट्ट्यात केळीचे मोठे नुकसान झाले. जोरदार चक्राकार वार्यांमुळे वडगाव रस्ता, विवरा रस्ता तसेच बर्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्यावर मोठ-मोठी झाडे ही जमीनदोस्त झाली. या पट्ट्यातील कापणी योग्य असलेल्या टीश्युकल्चर रोपांसह केळी बागांचे मोठे नुकसान झाले. या पट्ट्यातील शेकडो एकर केळी बागा जमीनदोस्त झाल्या. गेल्या आठवड्यात 300 ते 350 रुपये दरावरून केळीचे बाजारभाव चांगल्याच तेजीत येण्याचे संकेत दिसत असतांना तसेच 700 ते 800 रुपयांपर्यंत केळीची खरेदी सुरू झाली असतांना झालेल्या या नुकसानाने या पट्ट्यातील केळी उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत.
नुकसान भरपाईची मागणी
वारा इतक्या वेगात होता की शेतातील मोठ-मोठी झाडे उन्मळून पडली तर वीज तारा व इलेक्ट्रिक खांब वार्याच्या वेगात आडवे झाले व वीजपुरवठाही ठप्प झाला. 10 ते 12 किलोमीटरच्या या पट्ट्यात हे वादळ झाले.या वादळात शेकडो शेतकर्यांची हजारो क्विंटल केळी कोटींच्या घरात नुकसान झाले. या वादळाची नोंद घेत पंचनाम्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.