निंभोरा : येथील युवा रसिक मंडळातर्फे दरवर्षी डिसेंबर महिन्यात हास्य विनोदी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी वर्हाडातील सुप्रसिध्द हास्यविनोदी कलाकार डॉ. मिर्झा रफिक बेग यांनी कार्यक्रम सादर केला. त्यांच्यासोबत कांचन वीर यांनीही विनोदी कविता सादर केल्या. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक सुधाकर सोनवणे, मुरलीधर कोळी, प्रायोजक सुनिल कोंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या विनोदी शैलीने मिर्झा बेग यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
कार्यक्रमास निंभोर्यासह पंचक्रोशीतून खिर्डी, बलवाडी, वडगाव, विवरा, दसनूर, वाघाडी आदी गावातून श्रोते उपस्थित होते. वर्हाडी बोलीभाषेतील जांगळगुत्ता, धसकट, पोट्टे, सायाच्या आदी शब्दांनी रंगत आणली. संपूर्ण आठवडे बाजार परिसरात श्रोत्यांच्या अलोट गर्दीने भरलेले होते. सुत्रसंचालन धिरज भंगाळे, दिलीप सोनवणे यांनी तर प्रास्ताविक विजय सोनार, आभार शेख दिलशाद यांनी मानले. यशस्वीतेसाठी युवा रसिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.