निंभोरा रेल्वे उड्डाणपुलाच्या जागेसाठी दीपनगर प्रमाणे हवा मोबदला

0

निंभोरा येथे बैठकीत शेतकरी आक्रमक ; शेतकर्‍यांचा विरोध असलातरी नियोजित पूल होणार -खासदार रक्षा खडसे

निंभोरा- निंभोरा रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादीत होणार्‍या शेतजमिनीचा मोबदला दीपनगर जमिनीच्या संपादनाप्रमाणे मिळावा, अशी एकमुखी मागणी निंभोर्‍यातील शेतकर्‍यांनी कै.गिरधरशेठ किसान फ्रुटसेल सोसायटीत झालेल्या बैठक केली. यावेळी शेतकर्‍यांनी आक्रमक होत आपल्या भावना मांडल्या.

सहकार्य करा अन्यथा जमिनी हस्तांतरीत होणार -खडसे
खासदर रक्षा खडसे म्हणाल्या की, उड्डाण पुलाबाबत परीसराच्या मागणीमुळे मंजुरी आणण्यात आली. गेल्या वर्षभरापासून या कामाला सुरुवात झालेली नाही तसेच यासाठी ज्या जमिनी जात आहेत त्यांच्या साठी आठ ते नऊ लाख रुपयांऐवजी 18 लाखांपर्यंत रेडीरेकनर दर लागू करण्यात आला आहे व हा दर सर्वोच्च असून सर्वांनी या कामांत सहकार्य करण्याचे आवाहन केले. सोबत आपण यात सहकार्य न केल्यास शेवटी या विभागामार्फत जागा हस्तगत केली जाईल व काही प्रमाणात विरोध असला तरी याच मार्गाने हा उड्डाणपूल होईल त्यात तांत्रिक अडचणींमुळे बदल होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. उड्डाणपूल हा सर्वांसाठी भविष्यात उपयोगी होणार असल्याचे सांगत या कामी आम्ही जास्तीत जास्त मोबदला देण्याचे सांगितले असून हा निधी परत गेल्यावर भविष्यात यावर निधी मिळणार नसल्याचे स्पष्ट केले तसेच केंद्र सरकार व रेल्वे प्रशासना मार्फत याबाबतचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून याला विरोध झाला तरी ते जमीन अधिग्रहण करू शकतात व तेव्हा आपल्याकडे पर्याय नसतो, असेही खडसे म्हणाल्या.

वाणिज्य दराने मोबदला देण्याची मागणी
शेतकरी बबन जोशी यांनी रस्त्याला लागून शेत असून आम्हास चौरस मीटरप्रमाणे पैसे मिळण्याची मागणी केली तर आमच्या दुकानाच्या जागा या वाणिज्य दरात असून आमच्याकडे तसा उल्लेख ही उतार्‍यावर असल्याचे अनिल चौधरी व प्रवीण पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. खासदार खडसे यांनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून या बाबत सकारात्मक चर्चा करण्याचे आश्‍वासन दिले.सुभाष जोशी यांनी सर्वात जास्त जागा आमची (24 आर) जात असून उरलेली जमीन वहिवाटीस अडचणीची ठरेल, असे सांगितले व दीपनगर प्रमाणे वाढीव दर मिळण्याची मागणी केली. निंभोरा येथील शेतकरी प्रभाकर कोळंबे यांनी आम्हाला पहिलीच नोटीस असल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सूचना केली जात नसल्याचे सांगितले. नंदकिशोर महाजन यांनी हा पूल सर्वांसाठी असून या साठी शेतकर्‍यांचे नुकसान होते हे जरी खरे असले तरी त्याचा पुरेपूर मोबदला दिला जात असल्याचे सांगितले व कोणीही ही बाब वैयक्तिक घेऊ नये असे सांगितले व सार्वजनिक हिताचा विचार करावा असे आवाहन करीत यासाठी सकारात्मक विचार करावा, असे आवाहन केले.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीस खासदार रक्षा खडसे यांच्यासह जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, तहसीलदार विजयकुमार ढगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता इम्रान शेख, सरपंच डिगंबर चौधरी, तांदलवाडीचे सरपंच श्रीकांत महाजन, दुर्गादास पाटील, सुनील कोंडे यांच्यासह बबन जोशी, सुभाष जोशी, अनिल चौधरी, भास्कर पाटील, प्रवीण पाटील, नितीन पाटील, अनिल कोंडे आदींची उपस्थिती होती.