निंभोरा। येथील स्टेशन रस्त्यावर असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तिजोरीजवळील मुख्य दरवाजा न उघडल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र बँकेत लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात चोरटा कैद झाला असून पोलीसात तक्रार दिली आहे.
सीसीटीव्हीत चोराची प्रतिमा कैद
बँकेच्या मागील बाजूने खिडकीवर एसी लावला असून त्याला बाजूला फेकत चोराने बुधवार 5 रोजी बँकेत प्रवेश केला. बँकेत प्रवेशाच्यावेळी एक लाकडी दरवाजा हि तोडून चोराने तिजोरीकडे चोरीच्या उद्देशाने मोर्चा वळविला खरा मात्र त्या आधीचे लोखंडी गेट न उघडता आल्याने चोरीचा प्रयत्न फसला.
सेंट्रल बँकेत सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने सादर चोराची प्रतिमा त्यात फुटेज मध्ये आली. गुरुवार 6 रोजी सकाळी नियमितपणे शिपाई दिलीप वारके आणि कॅशीयर आनंद यांनी बँक उघडल्यावर सदर प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ बँक व्यवस्थापक एम.एच. लवंगे यांना माहिती दिली. बँक व्यवस्थापक लवंगे यांनी याबाबत निंभोरा पोलिसात तक्रार अर्ज दिला. या प्रकारामुळे सकाळी 2 तास उशिरापर्यंत बँक बंद ठेवण्यात आली होती.
दरम्यान या घटनेची माहिती घेण्यासाठी बँकेचे वरिष्ठ अधिकारी भेट देणार असून सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार निर्णय घेतला जाईल. तत्पुर्वी पोलिसांत नोंद केलेली आहे.
एम.एच. लवंगे, व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, निंभोरा