निंभोर्‍यात सराफा दुकानावर चोरट्यांचा दरोडा

0

मंकी कॅप चोरट्यांना शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान ; चोरीसाठी जालन्यातील चारचाकीचा वापर

निंभोरा, ता.रावेर- शहरातील फवारा चौकातील न्यू महालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानावर तीन ते चार मंकी कॅप घातलेल्या चोरट्यांनी दरोडा टाकत सोन्या-चांदीचे मिळून सुमारे 70 हजारांचे दागिने लंपास केले. या घटनेने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. विशेष म्हणजे एका ग्रामस्थाला जाग आल्याने श्री ज्वेलर्सचे सेंटर लॉक तोडून चोरटे चारचाकी वाहनाने पसार झाले. जळगावच्या श्‍वान पथकासह ठसे तज्ज्ञानीं ठसे घेतले असून श्‍वान पथकाने विवरे रस्त्यापर्यंतचा माग दाखवला तर या भागातील फरशा नाल्याजवळ बेवारस चारचाकी सापडल्याने चोरटे या वाहनाने येथे आल्याचा संशय आहे. शिवाय विना क्रमांकाची ही चारचाकी जालना येथून चोरून आणल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंकी कॅप चोरट्यांचा धुडगूस
निंभोरा गावातील रहिवासी तथा सराफ मनोज दामू पवार यांचे फवारा चौकात न्यू महालक्ष्मी ज्वेलर्स दुकान आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चारचाकीतून आलेल्या व मंकी कॅप घातलेल्या चार चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानातील 36 हजार रुपये किंमतीची चांदीची तर 30 हजार रुपये किंमतीची सोन्याचे दागिणे तसेच दोन हजार 500 रुपये किंमतीचे डीव्हीआर लांबवले. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा याच दुकानासमोरील श्री ज्वेलर्सकडे वळवला. दुकानाचे सेंटर लॉक तोडण्याचा प्रयत्न झाला मात्र ते तुटले नाही तर रहिवाशास जाग आल्याने चोरट्यांनी वाहनाने पळ काढला. मनोज पवार यांच्या फिर्यादीनुसार निंभोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे करीत आहेत.

चोरीसाठी जालन्यातील वाहनाचा वापर
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार तीन ते चार मंकी कॅप घातलेल्या चोरट्यांनी निंभोर्‍यातील चोरीसाठी जालना येथून चोरून आणलेल्या इंडिकाचा वापर केला तर रावेर शहरातूनही दोन चारचाकी चोरीस गेल्या असून त्या याच चोरट्यांनी लांबवल्याचा संशय आहे. एका चारचाकीचे इंधन संपल्याने रस्त्यात ती चारचाकी सोडून अन्य दुसर्‍या वाहनाने पसार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. निंभोरा पोलिंसाह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मंकी कॅप चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.