निकालाआधीच आत्महत्या

0

यवतमाळ: 12 वीचे पेपर खराब गेल्यानं आत्महत्येसारखा दुर्दैवी मार्ग पत्करणार्‍या यवतमाळमधील वणीतील रागिणी गोडे या विज्ञान शाखेच्या विद्यार्थीनीला 650 पैकी 504 गुण (77.54 टक्के) गुण मिळाले आहेत. उत्तम नर्तकी असलेली रागिणी नारायण गोडे हिला 10 वीच्या परीक्षेत 92.20 टक्के गुण मिळाले होते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 12वीची परीक्षा झाल्यानंतर पेपर खराब गेल्यामुळे रागिणी निराश झाली होती. ही बाब लक्षात आल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तिची समजूतही काढली. मात्र, त्यानंतरही ती तणावातच वावरत होती. तिला डॉक्टर व्हायचे होते.

तिची बिघडलेली मानसिक स्थिती पाहून वडिलांनी तिला उपचारासाठी यवतमाळ येथे नेले. उपचार घेतल्यानंतर वातावरणात बदल म्हणून तिला बाभूळगाव तालुक्यातील वाई (झोला) येथे मामाच्या गावाला नेण्यात आले. मात्र, 14 मार्चच्या सकाळी तिने मामाच्याच घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. मंगळवारी 12वीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये रागिणीला 78 टक्के गुण मिळाले. पण आपण नापास होऊ या केवळ भीतीपोटी रागिणीने जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.