जळगाव । जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जळगाव ग्रामीणच्या निवडणुकीची मतमोजणी शहरातल्या नूतन मराठा महाविद्यालयात सकाळी 10 वाजेपासून सुरु झाली होती. दुपारी 2 वाजे पर्यंत निवडणुकीच्या निकालाचे कामकाज सुरु होते. गट-गण निवडणुकींसाठी अनेक दिग्गज उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. अनेकांनी झालेल्या निआवडणुकी मध्ये आपले भविष्य आजमावले होते. यामध्ये कोणाला यश तर कोणाला अपयशाचा सामना करावा लागला आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांकडून निकाल देण्यात येत होता. आपल्या उमेदवाराच्या निकालाची घोषणा ऐकण्यासाठी जळगाव ग्रामीण मधल्या लोकांनी गर्दी केली होती. निकालाच्या घोषणा झाल्या बरोबर विविध पक्षाच्या कार्यकर्त्यां कडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात येत होता.
भाजपा कार्यालयात जल्लोषाचे वातावरण
जिल्हा परिषदेमध्ये एकूण 34 जागा निवडून आल्या नंतर जिल्ह्याच्या भाजपा मुख्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व ढोलाच्या तालावर एकच जल्लोष केला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसह ठेका धरून आनंद व्यक्त केला. या वेळी संपूर्ण भाजप कार्यलयाचा परिसर दणाणून गेला होता. फटाक्याच्या आवाजाने कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला होता. यावेळी आमदार सुरेश भोळे, प्रभाकर सोनावणे,आमदार चंदुलाल पटेल,भगत बालानी उपस्थित होते.
ढोल ताशांद्वारे आनंद साजरा
ग्रामीण जनतेसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या निवडणुका जनतेच्या प्रतिसादावर अवलंबून होत्या. निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणताही प्रकारचा वाद नको म्हणून जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून दक्षता म्हणून संपूर्ण निवडणूक निकाल सभागृहाला तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज संकुलाच्या आवरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी निकाल ऐकण्यासाठी गर्दी केली होती. जी.डी बेडाळे महाविद्यालय ते रींग रोड परिसरामध्ये पोलीस तैनात करण्यात आले होते.
पोलिसांशी वाद घालणार्याला अटक
निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतांना कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव सादर करीत होते. मतमोजणी चालु असलेल्या नुतन मराठा महाविद्यालयाच्या आवारात नागरिकांना उभे राहण्यासाठी बेरिकेट लावण्यात आले होते. मात्र काहींनी सीमा रेषा ओलांडली म्हणून एकाला पोलिसांनी हटकले. याचा त्याला राग येवून त्याने पोलिसा सोबत एकेरी भाषेत बोलून वाद घालण्याचा प्रयत्न केला. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी त्याला ताब्यात घेऊन कार्यवाही केली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात सन्नाटा
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी हा जिल्ह्यात दोन नंबरचा पक्ष ठरला. मात्र कोणत्याही प्रकारचा उत्साह आनंद साजरा करताना राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी आणि पदाधिकारी दिसून आलेले नाही. आज झालेल्या निवडणुकीचा उत्साह, आनंद भाजप-शिवसेना कार्यालयात दिसून आला.
मात्र राष्ट्रवादी कॉग्रेसच मुख्यालय आलेले आकाशवाणी चौकातील कार्यलयात सन्नाटाच होता. दरम्यान जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्हास्तरीय नेत्यांचा सहभाग कमी असल्याची चर्चा शहरात दिसून आली.