निकाल जाहीर करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू

0

मुंबई । मुंबई विद्यापिठाकडे असलेल्या उत्तरपत्रिकांपैकी 35 हजार 188 उत्तरपत्रिका सापडत नाहीत, त्यांचा शोध सुरू आहे, म्हणून त्या गहाळ झाल्याचा अर्थ काढू नये, त्याच दुसर्‍या गठ्ठ्यांमध्ये गेल्या आहेत. त्यांचा शोध सुरू आहे, असे सांगत 28 हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले आहेत त्या निकालांवर युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु देवानंद शिंदे यांनी पत्रकारांना दिली.

35 हजार उत्तरपत्रिका तपासण्याचे बाकी
17 लाख उत्तरपत्रिका मुंबई विद्यापीठाच्या 477 पैकी 469 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. 17 लाख 32 हजार 949 उत्तर पत्रिका तपासण्याचे काम बाकी होते, ज्यापैकी 35 हजार उत्तरपत्रिका तपासणे उरले आहे. आत्तापर्यंत 22 हजार 275 अर्ज हे पुनर्मुल्यांकनासाठी आले आहेत. तांत्रिक चुकांमुळे अनेक निकालांमध्ये गोंधळ झाला. या गोंधळामुळे काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळणे, काही विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिल्याचे दाखवले जाणे हे प्रकार घडल्याची माहिती अर्जुन घाटुळेंनी दिली. ज्या 2 हजार 630 विद्यार्थ्यांना विदेशात जायचे होते त्यांचे निकाल आम्ही लवकरात लवकर लावून दिले, त्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. असेही परीक्षा नियंत्रक घाटुळे यांनी स्पष्ट केले आहे.